बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट स्थिती सुकर व सुलभ करण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे कृषी विषयक कार्यक्रमांद्वारे शक्य ते सर्व तांत्रिक मार्गदर्शन, तज्ज्ञांकडून सल्ला, सूचना आणि अनुभवी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यास राज्यातील अनेक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन आकाशवाणी नागपूर केंद्राचे सहाय्यक निदेशक (कार्यक्रम) आणि कार्यक्रम प्रमुख चंद्रमणी बेसेकर यांनी केले आहे. आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कृषी आणि गृह विभागातर्फे आयोजित ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीच्या आकाशवाणी सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कृषी आणि गृह विभागातर्फे आयोजित बैठकीत ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीच्या गेल्या बैठकीचा आढावा आणि सूचनांवरील कार्यवाहीचे वाचन कार्यक्रम अधिकारी मनोहर पवनीकर यांनी केले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०१४ या त्रमासिकात प्रसारित होणाऱ्या कृषी आणि गृह विभागाच्या प्रस्तावित कार्यक्रमाचे पूर्वावलोकन कार्यक्रम अधिकारी संगीता अरजपुरे, जयंत उमरेडकर आणि वरिष्ठ उद्घोषक रवींद्र भुसारी यांनी केले. विदर्भाबाहेरील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, त्यांच्या यशस्वीतेच्या अनुभवांचे बोल कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आकाशवाणी नागपूर केंद्राचा उपक्रम फारच स्तुत्य व अभिनंदनीय आहे. कृषीवाणी, माझं घर माझं वावर, ओटीवर आणि गोकुळ या कार्यक्रमांचे नियोजन, त्यातील नवनवीन मालिका, उपयुक्त विषय आणि शेतकरी शास्त्र यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी नियोजित कार्यक्रमांविषयी तज्ज्ञ सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीला माहिती संचालक मोहन राठोड, पत्रसूचनाचे सहायक संचालक महेश अय्यंगार, कृषी उपसंचालक विभागीय कृषी सहसंचालक अजय राऊत, राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेडचे प्रबंधक दीपक देशमुख यांच्यासह कृषी क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन भुसारी यांनी केले, तर आभार संगीता अरजपुरे यांनी मानले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2014 रोजी प्रकाशित
आकाशवाणीच्या कृषी कार्यक्रमांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट स्थिती सुकर व सुलभ करण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे कृषी विषयक कार्यक्रमांद्वारे शक्य ते सर्व तांत्रिक मार्गदर्शन, तज्ज्ञांकडून सल्ला, सूचना आणि अनुभवी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो.
First published on: 12-06-2014 at 02:03 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural program on akashwani radio get good response from farmers