भारतात बहुसंख्य असलेल्या हिंदूना धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मिळणारी सापत्नभावाची वागणूक, पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका येथील हिंदूंवर होणारे अत्याचार आणि हिंदू धर्माचे रक्षण आदींवर विचार करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे येत्या ६ ते १० जून या कालावधीत गोवा येथे दुसऱ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील हिंदूंना या अधिवेशनात सहभागी होता यावे म्हणून अधिवेशनाचे इंटरनेटवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. हिंदू महासभेचेही सहकार्य या अधिवेशनासाठी लाभले आहे.
या अधिवेशनासाठी भारतातील २२ राज्यांमधील हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत. नेपाळ, मलेशिया, बांगलादेश या देशातील हिंदूही अधिवेशनात सहभागी होणार आहेत. हे अधिवेशन गोव्यातील रामनाथी, फोंडा येथील श्रीरामनाथ देवस्थान येथे होणार असल्याची माहिती समितीचे प्रसिद्धी समन्वयक अरविंद पानसरे यांनी दिली. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मातराद्वारे हिंदू धर्मियांवर होणारे आघात, दंगलखोरांना कायदेशीर पाठबळ मिळावे म्हणून केंद्र शासनाकडून आणला जाणारा व हिंदूना घातक ठरणारा कायदा, हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानांचे प्रसार माध्यमातून होणारे विडंबन, गोहत्या, हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून हा मंदिरनिधी स्वत:चे उत्पन्न म्हणून वापरणारे शासन, जिहादी दहशतवाद, बांगलादेशीयांची घुसखोरी आदी समस्यांवर अधिवेशनात ऊहापोह केला जाणार आहे. तसेच हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्ववाद्यांचे संघटन करून कामाची पुढील दिशाही अधिवेशनात ठरविण्यात येणार असल्याची माहिती पानसरे यांनी दिली. अधिवेशनाबाबत अधिक माहिती http://hindujagruti.org/summit या संकेतस्थळावर मिळू शकेल. किंवा अरविंद पानसरे (९३२३५८९६३७) /शिवाजी वटकर (०९३२३५८९६३७) यांच्याशी संपर्क साधावा.