scorecardresearch

जाणिजे जे यज्ञकर्म : सारेच बहुआयामी..पण काही अलक्षितच

यज्ञ हे एक शास्त्र व विज्ञान असल्यानं यज्ञातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा शास्त्रशुद्ध विधी आपल्या पूर्वसुरींनी तयार केला. आजही तेवढय़ाच काटेकोरपणे व तंत्रशुद्धरीतीनं यज्ञ केला तर फळ मिळतंच, असं मानलं जातं. यज्ञविधीत नियमितता, काटेकोरपणा व तंत्रशुद्धता महत्त्वाची असते.

जाणिजे जे यज्ञकर्म : सारेच बहुआयामी..पण काही अलक्षितच

यज्ञ हे एक शास्त्र व विज्ञान असल्यानं यज्ञातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा शास्त्रशुद्ध विधी आपल्या पूर्वसुरींनी तयार केला. आजही तेवढय़ाच काटेकोरपणे व तंत्रशुद्धरीतीनं यज्ञ केला तर फळ मिळतंच, असं मानलं जातं. यज्ञविधीत नियमितता, काटेकोरपणा व तंत्रशुद्धता महत्त्वाची असते.
   जेवण, अन्नग्रहण कसं करावं, हे सांगताना समर्थानी त्याला यज्ञकर्म समजून करावं, असं जरी म्हटलं असलं तरी कर्म, आपलं काम, व्यवसायसुद्धा यज्ञकर्माप्रमाणे असावा नाही का? यज्ञाचं अधिष्ठान ठेवताना हा यज्ञ कोणत्या कारणांसाठी, कोणत्या फलप्राप्तीसाठी आहे त्याप्रमाणं यज्ञविधीची आखणी व विधान होत असते. यज्ञ हे एक शास्त्र व विज्ञान असल्यानं यज्ञातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा शास्त्रशुद्ध विधी आपल्या पूर्वसुरींनी तयार केला. आजही तेवढय़ाच काटेकोरपणे व तंत्रशुद्धरीतीनं यज्ञ केला तर फळ मिळतंच, असं मानलं जातं. यज्ञविधीत नियमितता, काटेकोरपणा व तंत्रशुद्धता महत्त्वाची असते. कुठंही, कोणत्याही पातळीवर चूक होऊ नये, याची काळजी जुन्या काळी म्हणजे पुराण काळात किंवा राजेरजवाडय़ांच्या जमान्यात तसंच आताही कुणी यज्ञ केला तर घेतली जाते. कोणतंही शास्त्र म्हटलं की, त्या शास्त्रातील नियम आलेच आणि शास्त्रविहित कर्मासाठी नियमांचं पालन ओघानं आलंच.
आपला व्यवसाय, उपजीविका करताना ज्यांनी आपलं काम त्या व्यवसायाशी निगडित व्यावसायिक व सामाजिक बांधीलकी जपत, तत्त्वांशी तडजोड न करता ‘मी पणा’ला ओलांडून सातत्यानं केलं व करीत आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील काही यज्ञकर्मीचा परिचय आपण आतापर्यंत ‘जाणिजे जे यज्ञकर्म’ या सदरात वाचला. यातील काही व्यक्ती सर्वपरिचित होत्या. त्यांच्या कार्याची माहिती वाचकांना होती, काहींशी परिचयही होता, परंतु अशा व्यक्तींची ‘लोकसत्ता’च्या वाचकांना ओळख करून देताना त्यांच्या स्वभावातील आणि कार्यातील अप्रकाशित पैलूंचा परिचय वाचकांना करून देण्याचा प्रयत्न केला.
या सर्वच व्यक्ती म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्वच आहेत. लेखन मर्यादा असल्यानं त्यांच्याशी बोलताना त्यांचे कळलेले बरेच पैलू वाचकांपर्यंत पोहोचवू शकले नाही, याची बोच नक्कीच आहे. सर्वामध्ये असणारा समान धागा म्हणजे त्यांची पराकोटीची कर्तव्यनिष्ठा! आज आपण त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळं ओळखतो, पण प्रत्येकाचाच इथवरचा प्रवास कष्टसाध्य होता. आपल्या व्यवसायाशी त्यांची बांधीलकी, कर्तव्यतत्परता आणि नैतिकता यामुळेच त्यांना यज्ञकर्मी म्हटलं. या सर्वाशी या लेखानाच्या निमित्तानं झालेला परिचयही माझी वैयक्तिक उपलब्धी मानते. एकमेकांच्या कर्तृत्वाचे पैलू खरोखर दिपवणारे होते. व्यासंग आणि पत्रकारितेचा मापदंड मानले जाणारे मा.गो. वैद्य किंवा ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे, दोघेही ऐंशी वर्षांवरील तरुण! आजही या वयात त्यांची कर्मनिष्ठा, उत्साह थक्क करणारा आहे. त्यांची काम करण्याची तडफ पाहून आपल्या आळशीपणाची लाजही वाटली आणि वयोवृद्ध, तपोवृद्ध व ज्ञानवृद्धांसमोर नतमस्तक होताना खूप अभिमान वाटला.
आस्वादिनी कमलाताईंशी बोलताना अनेक स्वागत समारंभात चाखलेल्या त्यांच्या केटरिंगची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटलं. त्या चवीची भूक चाळवली. प्रकाशसरांच्या रुग्णसेवेवरील लेखांक प्रसिद्ध झाल्यावर घरात कुणी दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या काही वाचकांनी फोनवरून त्यांच्या घरात रुग्ण असताना होणाऱ्या परिस्थितीचे अनुभव सांगितले तेव्हा अशा कामाची किती गरज आहे, हे कळलं. काही एकटय़ा राहणाऱ्या वृद्धांनी फोनवरून त्यांचा एकटेपणा माझ्याबरोबर ‘शेअर’ केला. एका आजींनी ‘तू तुझ्या कामातून माझ्याशी बोलायला वेळ दिलास, खूप कौतुक वाटलं’ असं म्हणून कौतुकही केलं, पण त्यांच्यासाठी यापेक्षा काहीही करू शकत नाही, याचं  वाईट वाटलं. आज शिक्षक (गुरू नव्हे) आणि विद्यार्थी यांचं नातं कसं आहे, ते आपण बघतोच.
अशा पाश्र्वभूमीवर गुरुऋण फेडण्यासाठी तन-मन-धनानं झटणारे डॉ. बनकर विरळाच! आजारी कुत्र्याला दवाखान्यात घेऊन आल्यावर त्याच्या काळजीनं रडू फुटलेल्या एका आईचं (म्हणजे त्या डॉग ओनरचं) तितक्याच ममतेनं सांत्वन करणारे डॉ. मारवा बघताना डोळे पाणावले. देवबाप्पाच्या बुटिकमध्ये ‘डिस्प्ले’ म्हणून ठेवलेले-नटलेले- सजलेले राधाकृष्ण व लड्डू गोपाल बघून सुजाता भाभींच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. असं ‘टेस्टफु ली’ नटवलेले देव इतके सुंदर दिसतात, काय सांगू! एक ज्येष्ठ पत्रकार केशवराव पोतदार, नागपुरात वास्तव्यास असेपर्यंत हे सदर वाचून नियमितपणे माझ्या लेखनावर प्रतिक्रिया देत असत. एकदा त्यांनी खूप मजेशीर प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे लिहिता, या सर्वाशी तुमची ओळख कशी झाली? तुम्ही स्वत:हून त्यांना भेटला आहात का?’ पोतदारांनी वेळोवेळी ज्या प्रेमळ सूचना केल्या, कौतुक केले, लिखाणासाठी उत्तेजन दिलं, त्याबद्दल त्यांची कृतज्ञ आहे. कवी सुरेश भटांचे बंधू दिलीप भट, डॉ. श्रीकांत चोरघडे, डॉ. भाग्यश्री गंधे या व इतर अनेक वाचकांनी हे जे काही ‘वेडं वाकुडं’ लिहिलं त्याबद्दल नेहमीच प्रतिक्रिया (चांगल्याच बरं!) कळवल्या. या निमित्तानं या सर्वाशीच जुळलेले स्नेहबंध मला नेहमीच ऊर्जा देत राहतील. ‘जाणिजे जे यज्ञकर्म’ साठी सर्वच यज्ञकर्मीनी मन:पूर्वक सहकार्य केलं, त्यामुळेच वाचकांना त्यांची ‘ओळख’ करून देऊ शकले. वाचकांप्रमाणेच त्यांनीही माझ्या लेखनाचा प्रयत्न गोड मानून घेतला. या सर्वाशी झालेल्या परिचयामुळे माझाही व्यक्तिगत फायदाच झाला आहे.
विपश्यना शिबिरात जायचं, हे अनेक वर्षांपासून रेंगाळत राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. वीणा सावजींकडे केव्हा तरी हक्कानं जाणार आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस.. वर्ष, आपल्याला काही तरी शिकवत असतं. यावर्षी आपण सर्वच या व्यक्तिपरिचयातून खूप काही शिकलो आहोत. त्यासाठी या सर्व यज्ञकर्मीचे आपण ऋणी आहोत. याशिवाय, यांच्यासारखे अनेक यज्ञकर्मी समाजात आहेत. आपल्या अवतीभोवती आहेत किंवा अपरिचित आहेत, अशा सर्वाना मानाचा मुजरा! ‘लोकसत्ता’नं जो विश्वास माझ्यावर टाकला, तसंच नेहमीच जे सहकार्य केलं त्याबद्दल.. लोकसत्तातील सर्वच जण कृपया माझ्या भावना समजून घ्या. कारण धन्यवाद, आभार, ऋण, कृतज्ञ या शब्दांच्या पलीकडची ही भावना आहे.
नवीन वर्ष आपणा सर्वानाच मन:शांती, आनंद, आरोग्य व अनुभव समृद्धीचे जावो!   

मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-12-2012 at 01:52 IST

संबंधित बातम्या