कर वसुलीसाठी कोल्हापूर महापालिकेने मार्च महिन्यातील सर्व सुट्टय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे. कोल्हापूर महापालिकेने सन २०१२-१३ चे स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीचे अंदाजपत्रकीय उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अजूनही महापालिकेने उर्वरित एका महिन्यात (मार्च) किमान १० कोटी रुपयांचा कर गोळा करण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यातील कामकाजाचे दिवस व सुट्टय़ा यांचा विचार करता प्रत्यक्ष कामकाजासाठी दिवस अपुरे पडत आहेत, असे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी मार्च महिन्यातील सर्व सुट्टय़ा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुट्टीच्या दिवशी निर्धारित वेळेत कामकाज सुरू राहणार आहे. नंतरच्या कालावधीत मागणीप्रमाणे पर्यायी सुट्टय़ा देण्यात येणार आहेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.