येथील नागरिकांनी एकजूट दाखवून अडीच तास रेलेरोको आंदोलन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नमते घेत आंदोलनकर्त्यांंना येथील क्रु बुकिंग कार्यालय हलविण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात सुमारे दहा हजारांवर लोकांनी सहभाग घेतला.
पूर्णेत निजाम काळापासून कार्यरत असलेले रेल्वेचे क्रु बुकिंग कार्यालय नांदेडला हलविण्याचा घाट घातला होता. या बाबत पूर्णेतील विविध पक्ष संघटनाच्या वतीने कार्यालय जाऊ नये, म्हणून प्रयत्न केले जात असतानाही रेल्वे प्रशासन दाद देत नव्हते. मात्र, बुधवारी सकाळी शहरातील सर्व पक्षांच्या वतीने रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहरातील सर्व पक्षांचे कार्यकत्रे, महिला, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी सकाळी १० वाजता तिरूपती-अमरावती ही एक्सप्रेस गाडी पूर्णा रेल्वे स्थानकाबाहेर अडीच तास रोखून धरली. त्यामुळे सर्व रेल्वेगाडय़ा विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या.
आंदोलनामुळे नांदेड-अमृतसर, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस या गाडय़ा अडीच तास उशिराने धावल्या. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना रेल्वेचे सहायक विभागीय व्यवस्थापक पी. बी. निनावे यांनी कार्यालय हलविणार नसल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. शिवसेनेचे आमदार संजय जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, मनसे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांच्यासह पूर्णा शहरातील सर्व पक्षांचे नेते-कार्यकत्रे, धर्मगुरू, महिला, पत्रकार, व्यापारी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शर्मा मात्र आंदोलनाकडे फिरकले नाहीत. पूर्णा शहरातील नागरिक व सर्व पक्षांच्या कार्यकत्रे, व्यापाऱ्यांनी पूर्णा शहरात कडकडीत ‘बंद’ पाळून आंदोलनात मोठा सहभाग नोंदविला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.