अनुदानाची गरजच काय?

’ तुम्ही हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये काम करता. या दोन्ही चित्रपटसृष्टींमधील फरक आणि साम्य काय? खरंतर फरक असा काहीच नाही. हिंदीत जे तंत्रज्ञान वापरलं जातं, तेच तंत्रज्ञान मराठीत वापरतात. पण अर्थकारण आणि बजेटच्या दृष्टीने दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये महद्अंतर आहे.

’ तुम्ही हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये काम करता. या दोन्ही चित्रपटसृष्टींमधील फरक आणि साम्य काय?
खरंतर फरक असा काहीच नाही. हिंदीत जे तंत्रज्ञान वापरलं जातं, तेच तंत्रज्ञान मराठीत वापरतात. पण अर्थकारण आणि बजेटच्या दृष्टीने दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये महद्अंतर आहे. हिंदी चित्रपट हा प्रामुख्याने लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनवला जातो. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग हा चित्रपट या माध्यमाकडे केवळ आणि केवळ मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहतो. त्यातून त्याला समाजप्रबोधन किंवा या माध्यमाची सामाजिक जबाबदारी याच्याशी काहीच देणंघेणं नसतं. त्यामुळे तिथे तद्दन मसालेदार चित्रपटही शंभर कोटींच्या क्लबमध्ये जातात. त्याउलट मराठीत असे मसालेदार चित्रपट बनवले, तर मराठी प्रेक्षक तिथे फिरकतही नाही. मला वाटतं की, मल्टिप्लेक्समुळे मराठी चित्रपट पाहणारा आणि विविध विषयांवरील चित्रपटांना मान्यता देणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग मराठी चित्रपटसृष्टीसाठी तयार झाला आहे.
’ या दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये तुम्ही अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून वावरलात. त्यापैकी तुम्हाला सुखावह वाटणारी भूमिका कोणती?
या तीनही भूमिका एकमेकींना पूरक आहेत. माझ्या संघर्षांच्या काळात आताएवढी संधी आम्हाला उपलब्ध नव्हती. आमच्या वेळी दूरदर्शनवरच्या एखाद्या मालिकेत छोटंसं काम मिळवण्यासाठीही आम्हाला प्रचंड झगडावं लागायचं. नाटकं तर फक्त मध्यम वयातील माणसांसाठी आणि मध्यम वयातील माणसांनी करायची, अशीच होती. त्यामुळे तिथेही माझ्यातल्या अभिनेत्याला कधीच वाव मिळाला नाही. शेवटी मी नाटकनिर्मिती करण्यावर भर दिला. पुढे बी. पी. सिंगबरोबर काम करत असताना या ‘प्रोसेस ऑफ मेकिंगचं’ खूप आकर्षण वाटलं. मग दिग्दर्शनात उतरलो. दिग्दर्शन करत असताना आपल्याला हव्या त्या विषयावर चित्रपट काढता यावा, या विचाराने निर्मिती क्षेत्रात आलो. दरम्यान, अभिनय वगैरे विसरलो होतो. पण मग अनेकांनी अभिनयासाठी विचारणा केली. आता तर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चांगल्या चित्रपटांतून चांगल्या भूमिका मिळतात. मग तिथे मिळणारा पैसा इथे एखादं चांगलं आणि वेगळ्या विषयावरचं नाटक काढण्यासाठी वापरतो. त्यामुळे या तीनही गोष्टी एकमेकींना पूरक आहेत.
’ मराठी चित्रपटसृष्टी अर्थकारणात एवढी मागे का?
याचं मुख्य कारण म्हणजे खूपच मर्यादित प्रेक्षकसंख्या आणि भरमसाट चित्रपटांची निर्मिती! दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी सोडली, तर इतर कोणत्याही प्रादेशिक चित्रपटांनी आपले चित्रपट डब करून हिंदीत आणण्याचं धाडस केलेलं नाही. त्यामुळे आपला प्रेक्षकवर्ग खूपच मर्यादित राहिला आहे. आता ही व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर मानसन्मान मिळत आहे. पण आता या सगळ्या वातावरणाचा फायदा करून घ्यायला हवा. हे सगळं लगेचच होईल, असं नाही. पण आपण मार्ग चोखाळले पाहिजेत. विविध प्रयोग करून बघण्याची गरज आहे. ते प्रयोग यशस्वी झाले, तर मग मराठी चित्रपटसृष्टीही अर्थकारणात मागे राहणार नाही.
’ आत्ता तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचा उल्लेख केलात. या चित्रपटांचे रिमेक्स हिंदीत होतात. मात्र मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत सरस असूनही त्यांचे रिमेक्स का होत नाहीत?
मी सांगितल्याप्रमाणे हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गाला फक्त मनोरंजन हवं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांत तो मसाला ठासून भरलेला असतो. त्यामुळे त्या चित्रपटांचे रिमेक्स होतात आणि ते चित्रपट चांगली कमाईदेखील करतात. आपल्या चित्रपटांचं तसं नसतं. आपले चित्रपट विचार करायला लावतात. त्यामुळे एक विशिष्ट वर्गच ते पाहण्यासाठी गर्दी करतो.
’ काही अपवाद वगळता मराठीतील प्रसिद्ध कलाकारांना हिंदीत अतिशय दुय्यम भूमिका मिळतात. याचं कारण काय? मराठी कलाकारांना पाण्यात पाहण्याचा स्वभाव म्हणायचा का?
छे, छे! आपल्याला कोणी पाण्यात वगैरे पाहत नाही. उलट मराठी कलाकार आपल्या अभिनयावर खूप बारकाईने काम करतात, म्हणून आपलं कौतुक होत असतं. पण या प्रश्नाच्या उत्तराची गोम आपल्या जडणघडणीत आहे. आपण मराठी लोक खूप भिडस्त असतो. आपल्या चांगल्या गुणांची किंवा कामांची प्रसिद्धी आपण फारशी करत नाही. कामाच्या लोकांना वारंवार जाऊन भेटणं, वगैरे आपल्या रक्तात नाही. त्यामुळे आपल्याला हिंदीत चांगली कामं मिळत नसावीत. दुसरी बाजू म्हणजे, आज मराठी चित्रपटसृष्टीतच एवढं काम आहे की, इथे उत्तम अभिनेत्यांना कामाची अजिबात वानवा नाही. त्यामुळे हिंदीत दुय्यम भूमिका करण्यापेक्षा आपले कलाकार मराठीत चांगल्या भूमिका करण्यावर भर देत असावेत.
’  अनुदानाला विरोध करताना तुम्ही नेहमीच आक्रमक भूमिका मांडलीत..
हो! आणि मला आजही माझी भूमिका अत्यंत योग्य वाटते. एक नजर टाकलीस, तर दरवर्षी तब्बल ७० ते ८० मराठी चित्रपट प्रसिद्ध होतात. यापैकी फक्त ७ ते ८ चित्रपट दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारे असतात. इतर सगळे टाकाऊ असतात, असं म्हणायला हरकत नाही. मग अशा चित्रपटांना अनुदान कशाला द्यायला हवं. माझ्या ओळखीतलेच काही निर्माते आहेत की जे २० लाखांत चित्रपट करतात आणि अनुदानातून २५ लाख उकळतात. तूच विचार कर, २० लाखांत बनणाऱ्या चित्रपटाचा दर्जा काय असेल! मी अनुदानाला विरोध केलेला नाही, ते वाटण्याच्या पद्धतीला विरोध केलाय.
’ पण मग अनुदान देऊच नये का?
द्यावं ना! पण ते देताना एक प्रक्रिया आखायला हवी. तुम्ही मोजक्या दहाच चित्रपटांना ५० लाख रुपये अनुदान द्या. ते देण्याआधी चित्रपटाची गोष्ट, संहिता मागवून घ्या. त्या गोष्टीचं वाचन समाजातल्या विविध स्तरांतल्या ५० लोकांपुढे करा. त्यांना ती संहिता पसंत पडली, तर मग विविध दिग्दर्शक, निर्माते यांच्यासमोर चित्रपटकर्त्यांला छोटेखानी प्रस्ताव मांडायला सांगा. तो प्रस्ताव व्यवहार्य वाटला, तर द्या ना त्याला अनुदान! पण सरसकट अनुदान देण्याची काहीच गरज नाही. मुळात नाटक किंवा चित्रपट हा एक व्यवसाय आहे. उद्या एखाद्या शिंप्याने अनुदान मागितलं, तर त्यात काय चुकलं त्याचं! तोदेखील एक व्यवसाय करतोय. जोपर्यंत आपण नाटक आणि चित्रपट या गोष्टींना सांस्कृतिक, परंपरा वगैरे चौकटीतून बाहेर काढून त्यांच्याकडे शुद्ध व्यवसाय म्हणून बघत नाही, तोपर्यंत मराठी चित्रपटसृष्टी वाढणार नाही. आपल्याकडे दीड कोटी रुपये खिशात असलेल्या एखाद्या माणसाला दिग्दर्शक गाठतो. भलतीसलती स्वप्नं दाखवून त्याच्याकडून पैसे उकळतो. पुढे तो निर्माता कुठेच दिसत नाही. हिंदीत जशी मोठमोठी प्रॉडक्शन हाऊसेस आहेत, तशीच मराठीतही तयार व्हायला हवीत. अनुदानाचं गाजर बंद केलं, तर ज्यांना खरोखरच या क्षेत्रात व्यवसाय म्हणून तयारीने उतरायचं आहे, तेवढेच लोक येतील.
’ ‘मिफ्टा’ हा सध्या फक्त एक पारितोषिक समारंभ एवढय़ापुरताच मर्यादित असल्याची टीका होते. पण मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का?
अर्थातच. आणि आता ‘मिफ्टा’ नसून ‘मिक्ता’ आहे. म्हणजे ‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर अ‍ॅवॉर्ड्स.’ ‘मिक्ता’च्या माध्यमातून आम्ही काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या आयोजकांच्या संपर्कात आहोत. त्या चित्रपट महोत्सवांसाठी मराठी चित्रपट पाठवण्यात यावेत, यासाठी ‘मिक्ता’ मध्यस्थाची भूमिका बजावेल. त्याचबरोबर फिल्म बाजारसारख्या कार्यक्रमांतही ‘मिक्ता’ मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी मोठी व्हावी, या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल ठरेल.
अनुदानामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. दरवर्षी असंख्य चित्रपट प्रदर्शित होण्यामागे अनुदानाचं गाजर, हे मोठं कारण आहे. चित्रपट आणि नाटक हे व्यवसाय आहेत. त्यामुळे त्यांना अनुदानाच्या कुबडय़ांची गरज नसावी.. सांगताहेत
महेश मांजरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: An interview with mahesh manjrekar by rohan tilly mahesh manjrekar actor

Next Story
चित्रगीत : श्रीसिद्धिविनायक महाआरती व आदि गणेश
ताज्या बातम्या