महाराष्ट्रातील उपेक्षित कलावंतांना न्याय न मिळाल्यास राज्य पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा कलाकार विचार मंच या संस्थेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कलावंतांच्या समस्या व अपेक्षा या संदर्भातील सविस्तर निवेदन पवार यांना देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मोहन जगताप, लक्ष्मीकांत निकम, गोविंद कुलकर्णी, पूजा लाहोटी, विशाल चव्हाण, पंकज गांगुर्डे, सागर कांबळे, राज अटक हे उपस्थित होते.ग्रामीण व शहरी भागातील उपेक्षित कलावंतांना प्रतिमाह किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, रंगमंचामागे काम करणाऱ्या सर्व साहाय्यक कलावंतांना ग्रामीण व शहरी भागात किमान ६०० स्क्वेअर फुटांचे घर विनामूल्य द्यावे, युवाकलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे जनतेपर्यंत प्रचार व प्रसाराचे काम देण्यात यावे व याकरिता मानधन देण्यात यावे. नाशिक जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता लक्षात घेऊन येथे चित्रपट चित्रीकरण ठिकाणे निश्चित करण्यात यावीत, नवोदितांना अभिनय क्षेत्रात संधी मिळावी म्हणून स्थानिक पातळीवर प्रशिक्षण शाळा उभारण्यात यावी, यांसह इतर अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.