अ‍ॅड. दत्ता भुतेकरांचा जिल्हा बँकेला इशारा
आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने शेतकऱ्यांना त्यांच्या मुदती ठेवी पंधरा दिवसाच्या आत परत कराव्या, बँकेने दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अधिक अंत पाहू नये, ठेवी परत न मिळाल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच बँक प्रशासन व व्यवस्थापनाच्या विरोधात फ ौजदारी खटले दाखल करण्यात येतील, असा इशारा शेकापचे नेते अ‍ॅड. दत्ता भुतेकर यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मुदती ठेवी त्वरित परत मिळाव्यात, यासाठी अ‍ॅड. भुतेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक करे यांची नुकतीच भेट घेतली.
त्या भेटीत येत्या दहा दिवसात ठोस कारवाई करण्याचे आश्वासन करे यांनी दिले. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसह जिल्ह्य़ातील विविध शाखांमध्ये शेतकऱ्यांनी कोटय़वधी रुपयांच्या मुदती ठेवी ठेवलेल्या आहेत. या ठेवींची मुदत संपली आहेत, परंतु मुदत झालेल्या ठेवींची रक्क म जिल्हा सहकारी बँक व त्यांच्या शाखा या शेतकऱ्यांना देण्यास टाळटाळ करीत आहेत.
मुदत ठेवीची रक्क म न मिळल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
अनेक शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने त्यामुळे थांबली आहेत. शेतकऱ्यांच्या मुदती ठेवी त्यांना परत मिळण्यासाठी बँकेला आवश्यक ते निर्देश देण्याचे आपण जिल्हा उपनिबंधकांना सूचित केल्याचे भुतेकर यांनी सांगितले. यासंदर्भात लवकर निर्णय न झाल्यास शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ठेवी परत मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचे देखील भुतेकर यांनी सूचित केले आहे.