जिल्हा मुख्याध्यापक संघाचा इशारा
 मुख्याध्यापकांवर अगोदरच शैक्षणिक व प्रशासकीय कामाचा प्रचंड बोजा असतांना त्यांच्यावर अतिरिक्त भार म्हणून देण्यात आलेली शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यात यावी अन्यथा, १ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ातील सर्व शाळांमधील खिचडी शिजविण्याच्या कामावर बेमुदत बहिष्कार घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
केंद्र व राज्य शासनाची ही योजना विद्यार्थ्यांसाठी चांगली असली तरी मुख्याध्यापक व शिक्षकांना कटकटीची ठरली आहे. या योजनेची अंमलबजावणी करतांना कोणताही दोष नसताना अनेकदा मुख्याध्यापकांना विनाकारण प्रशासकीय व फौजदारी कारवाईचा सामना करावा लागतो. वाढत्या तक्रारी, चौकशा व कारवायांमुळे मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत.
केंद्र व राज्य शासनाची सरकारी, निमसरकारी व अनुदानित शाळांसाठीची माध्यान्ह भोजन योजना विद्यार्थ्यांसाठी एक उपलब्धी असली तरी शासनाने यासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण न करता या योजनेची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकली आहे.
मुख्याध्यापकांवर अगोदरच शैक्षणिक व प्रशासकीय कामांचा प्रचंड बोजा आहे. या योजनेमुळे त्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यांना या योजनेकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते.
अध्यापनाचे व प्रशासनाचे काम करतांना नाकीनऊ येत असतांना त्यांना खिचडीचा हिशेब, शिजविणे व वाटप, अशी कामे करावी लागतात. त्यांचा भरपूर वेळ यात जातो. हे काम कितीही काळजीपूर्वक केले तरी त्यात काही त्रुटी राहण्याची शक्यता असते. नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक या खिचडी योजनेची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवितात. या योजनेबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी होतात. तपासणी, चौकशी व कारवाईला मुख्याध्यापक त्रासले आहेत.  या योजनेमुळे मुख्याध्यापकांची कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे शाळेवरील शैक्षणिक व प्रशासकीय नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व बाबींचा विचार करता मुख्याध्यापकांकडील पोषण आहाराची जबाबदारी स्वतंत्र व सक्षम यंत्रणेकडे देण्यात यावी अन्यथा, १ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ातील अनुदानित शाळांमध्ये खिचडी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र वानखेडे, व्ही. टी. भारसाकळे, बाळासाहेब फिरके, प्रा. डी. बी.उ बरहंडे, आर. एस. उबरहंडे, प्रा. डी. टी. जाधव, प्रा. व्ही. एन. देशमुख, प्रा. ए. एस. चेके, प्रा. ए. पी. नरवाडे, प्रा. व्ही. ओ. बोंडे, प्रा.  आर. डी. तायडे, प्रा. ए. एस. आराख, प्रा. बी. एन. वानेरे यांनी दिला आहे.