संग्रामनगर (ता. माळशिरस) येथील काही देशी, गायी, म्हशी, गाढव आदी मुक्या प्राण्यांवर अॅसिड फेकल्याने या भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोलापूरच्या प्राणिमित्र आणि काही संघटनांकडून या जखमी जनावरांवर उपचार केले जात असले तरी ही मुकी जनावरे मरणप्राय यातना भोगत आहेत.
अकलूजनजीक संग्रामनगर ही उच्चभ्रू लोकवस्ती असणारे शहर असून नवीन वसलेल्या या शहरात व लगत शेतजमीन आहे. त्यामध्ये संबंधित शेतकरी पिके घेतात. या शहरातील काहीजण जनावरे पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांची जनावरे शिवाय काही मोकाट जनावरे या भागात फिरत असतात. सोमवारी सायंकाळी या जनांवरांपैकी तीन देशी गायी, दोन म्हशी व दोन गाढवांवर अॅसिड फेकल्याने होणाऱ्या जखमा आढळून आल्या. या जनावरांच्या विशेषत: शौचाच्या जागी व पाठीवर शेपटीखाली जखमा झाल्या आहेत. त्यामुळे जनावरांची कातडी सोलून निघाली आहेत. दिवसभराच्या पावसाच्या रिपरिपीमुळे त्या जखमा चिघळत असूनही या जखमा अंगावर घेऊन ही जनावरे फिरत आहेत.
ही घटना समजताच सोलापूरचे प्राणीप्रेमी बाबुराव जगताप यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यामुळे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. आर. एन. कदम, पशुधन विकास अधिकारी एस. डी. ठवरे, सी. आर. वायदंडे आदींनी या जनावरांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत.
या जनावरांमुळे कुणाच्या पिकांचे अगर अन्य फुले, फळे झाडांचे नुकसान होत असले तरी त्या मुक्या जनावरांवर अॅसिड फेकायला नको होते. तसेच ही जनावरे पाळणाऱ्यांनीही आपल्या जनावरांची सोय करायला पाहिजे होती. अशा उलटसुलट चर्चा प्रतिक्रिया सुरू आहेत. मात्र जखमी जनावरांबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2013 रोजी प्रकाशित
अकलूजजवळ संग्रामनगरमध्ये जनावरांवर फेकले अॅसिड
संग्रामनगर (ता. माळशिरस) येथील काही देशी, गायी, म्हशी, गाढव आदी मुक्या प्राण्यांवर अॅसिड फेकल्याने या भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
First published on: 01-08-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animals injured due to acid in sangram nagar near akluj