सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विजापूर रस्त्यावर रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराकरिता सोलापूर महापालिका प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात तेथील शेतजमिनीचा ताबा घेतला व तेथील उभी पिकं बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आली. त्या वेळी शेतजमिनीवर मालकी हक्क सांगणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांनी या कारवाईस हरकत घेतल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात बहुसंख्य महिलांचा समावेश आहे.
ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा काळात मागील पन्नास वर्षांपासून रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील २० एकर क्षेत्रातील खुल्या जागेत जनावरांचा बाजार भरतो. परंतु या जमिनीवर प्रकाश काशीनाथ गडदुरे व त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडून आदेश आणून ताबा वहिवाट सुरू केली आहे. त्याठिकाणी ज्वारी, मका, गहू, बाजरी, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. ही पिके उभी असतानाच सिद्धेश्वर यात्रा काळात जनावरांचा बाजार भरविण्यासाठी या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला असता पुन्हा एकदा न्यायालयीन लढा झाला. यात सिद्धेश्वर मंदिर समिती व महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्या विरोधात शेतकरी गडदुरे यांनी अपील केले असता त्यावर येत्या १६ जानेवारी रोजी सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे.
दरम्यान, जागेचा वाद निर्माण झाल्याने जनावरांचा बाजार कोठे भरवायचा, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. अखेर ही जागा महापालिकेने ताब्यात घेऊन सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्याची कार्यवाही हाती घेतली असता सुरुवातीला पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने पालिकेच्या पथकाला माघारी फिरावे लागले होते. परंतु शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुमारे शंभर पोलिसांचा फौजफाटा व चार जेसीबी व बुलडोझरची यंत्रणा घेऊन गडदुरे यांच्याकडील शेतजमीन ताब्यात घेण्यात आली. या कारवाईला गडदुरे कुटुंबीयांना जोरदार हरकत घेतली असता पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करून १५ महिलांना ताब्यात घेतले. संपूर्ण उभी पिके उद्ध्वस्त होत असताना गडदुरे कुटुंबीय आक्रोश करताना दिसून आले.