मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या बाजारपेठांमधील सुमारे साडेसहा हजार व्यापाऱ्यांपैकी जेमतेम १५० व्यापारी स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) टप्प्यात येत असल्याचे उघड होत असून असे असताना अन्नधान्याच्या बाजारपेठा बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरण्याचे उद्योग काही मूठभर व्यापाऱ्यांनी सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या एलबीटीच्या यादीतून फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कांदा-बटाटा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. बदाम, अक्रोड, खजूर, अंजीर, काजू यासारख्या सुकामेव्याचा एलबीटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाशीतील मसाल्याच्या घाऊक बाजारपेठेत सुकामेवा विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रभावशाली गट कार्यरत असून या गटामार्फत सगळ्यात बाजारपेठा बंद रहाव्यात यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे एलबीटीच्या यादीतून अन्नधान्ये वगळण्यात आली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून धान्यांच्या बाजारपेठा बंद ठेवून सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
एलबीटीमुळे भाज्या, डाळी, मासे महागणार असा चुकीचा प्रचार मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील व्यापाऱ्यांचा एक मोठा गट करू लागला असून ठाण्यातील वडापाव विक्रेत्यांनाही एलबीटीचा बागुलबुवा दाखवत दुकाने बंद करावयास या गटाने भाग पडल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे. ठाणे शहरात चहाची टपरी लावणाऱ्या किरकोळ विक्रेत्यालाही धमकाविले जात असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महापालिकेने गेल्या १५ वर्षांपासून जकातीला फाटा देत उपकराची पद्धत अमलात आणली आहे. ही करपद्धत बऱ्याचअंशी एलबीटीशी सुसंगत आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत गेली अनेक र्वष अन् नधान्याला उपकराची आकारणी होत असे. या उपकरामुळे भाज्या, डाळी महागल्या असे कधी झाले नाही. विशेष म्हणजे, राज्य सरकारने ठाणे, नवी मुंबईत एलबीटी लागू करताना त्यामधून वगळण्यात आलेल्या सुमारे १५० वस्तूंची भल्यामोठय़ा यादीतून अन्नधान्य वगळल्याने महापालिकेला वर्षांला १५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपकर विभागाचे प्रमुख सुधीर चेके यांनी वृत्तान्तला दिली. एलबीटीच्या यादीत भाजीपाल्यासह कोणत्याही स्वरूपाच्या अन्नधान्यांचा समावेश नाही. मसल्याच्या पदार्थामध्येही मिरच्या, धणे, हळद, आले, सुंठ अशा पदार्थाचा समावेश नाही. कोंबडय़ा, मेंढय़ा, बक ऱ्या, डुक्कर, मासे अशा मांसाहारावरही एलबीटी लागू होत नाही. बदाम, अक्रोड, अंजिर, काजू अशा सुकामेव्यावर एलबीटी लागू होतो, त्यामुळे एपीएमसीमधील सुमारे १०० व्यापाऱ्यांचा एक ताकदवान गट अतिशय अस्वस्थ आहे. फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांना मानणारा हा सगळा गट असून त्यांच्यामार्फत भाजीपाला, अन्नधान्य, कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनाही बंदमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव वाढविला जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून अन् नधान्य तसेच मसाल्याच्या घाऊक बाजारपेठा पूर्णपणे बंद असून एलबीटी आणि अन् नधान्यांचा संबंध नसतानाही या बाजारातील व्यापारी बंदमध्ये का सहभागी झाले हे मोठे कोडे आहे. एपीएमसीमध्ये एकूण सहा हजार व्यापारी धंदा करतात. त्यापैकी अवघ्या १५० व्यापाऱ्यांना एलबीटी लागू होणार आहे, असे चेके यांनी स्पष्ट केले. एलबीटी माध्यमातून नोंदणी झाला याचा अर्थ कर लागू झाला असा होत नाही, असेही ते म्हणाले. सुकामेव्याला एलबीटी लागू होत असून ज्या मसाल्याच्या पदार्थाना यापूर्वी उपकर लागू होता त्याचे दर एलबीटीमुळे कमी झाल्याचेही चेके यांनी स्पष्ट केले.
एलबीटीमधून वगळण्यात आलेल्या वस्तू तसेच पदार्थाची यादी
गहू, तांदूळ, सर्व प्रकारची अन्नधान्य (डाळी), दूध, अंडी, भाजीपाला, कांदा, बटाटा, फळे, लसूण, आले, मासे, कोंबडी, मासेमारीसाठी लागणारी जाळी, बकऱ्या, मेंढय़ा, डुक् कर, कोंबडय़ा, गाय, बैल, दही, ताक, पोहे, लाह्य़ा, चिरमुरे, खादीचे कपडे, ब्रेड (पिझ्झा वगळून), चरखा, हातमाग, गांधी टोपी, हिरवे नारळ, हळद, हळद पावडर, मिरच्या, मीठ, सौर उर्जेवर चालणारी यंत्रे, ऊस, मत्सखाद्य, गुरांचे खाद्य, कोंबडय़ांचे खाद्य, प्रथिनेजन्य पदार्थ, मातीचे दिवे, पणत्या, औषधे, कॅन्सर एड्सवरील औषधे, कॉन्ट्रासेप्टिव्ह, झाडा-फुलांची रोपे, फुले, मनुष्याचे रक्त, कुंकू, टिकल्या, सिंधुर, मटण, राष्ट्रध्वज, खत, राख्या, वर्तमानपत्रे, नीरा, काथा, लॉटरीची तिकिटे, सुंठ, मिरी इ.