कोल्हापूर-सांगली मार्गाच्या चौपदरीकरणात अडथळा ठरणाऱ्या जयसिंगपूर व हातकणंगले येथील उड्डाणपूल बांधण्यास अखेर मंगळवारी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता दिली. या कामासाठी ७५ कोटी रुपये वाढीव खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सत्वर दाखल करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. दोन्ही उड्डाणपूल होण्यासाठी शिरोळचे आमदार डॉ.सा.रे.पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, चौपदरीकरणाचे काम गतीने होण्याची शक्यता बळावली आहे.     
कोल्हापूर ते सांगली या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या हातकणंगले व प्रमुख बाजारपेठ असलेले जयसिंगपूर या दोन गावांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचा समावेश प्रस्तावित कामामध्ये आहे. उड्डाणपूल बांधण्याला दोन्ही गावांमध्ये विरोध होत होता. तरी काहीजणांकडून समर्थन केले जात होते. जयसिंगपूर नगरपालिकेने तर उड्डाणपूल होऊ नये असा ठरावच मंजूर केला होता. तथापि आमदार सा. रे. पाटील यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना लोकभावना लक्षात घेऊन भूमिकेत बदल करण्यास भाग पाडले होते. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नी बैठक झाली. आमदार सा. रे. पाटील यांनी उड्डाणपुलाची पाश्र्वभूमी समजावून सांगून यासाठी कितीही खर्च आला तरी तो शासनाने करावा, असा आग्रह धरला. चर्चेत आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार संभाजी पवार आदींनी भाग घेतला. भुजबळ यांनी दोन्ही उड्डाणपुलांना हिरवा कंदील दाखवून या कामांना मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन लवकरच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. जयसिंगपुरातील डॉ. सतीश पाटील इस्पितळ ते जनतारा हायस्कूल असा अर्धा किलोमीटरहून अधिक अंतराचा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. चर्चेत शिवसेनेचे जयसिंगपूर अध्यक्ष सुरेश भोसले, संघटक अॅड. संभाजी नाईक, भाजप शहराध्यक्ष संजय वैद्य, मनसेचे भगवान जांभळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, सदाशिव पोफळकर, कॉ.रघुनाथ देशिंगे आदींनी भाग घेतला.