एक वर्षांपूर्वी ४८ लाख रुपये खर्चून घेतलेल्या एक हजार कचराकुंडय़ा नेमक्या आहेत कोठे, यावरून स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी वाद झाला. या सर्व कचराकुंडय़ांची माहिती पुढच्या बैठकीत सदस्यांना द्यावी, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष नारायण कुचे यांनी दिले.
शहरातील वेगवेगळ्या सहा प्रभागांमध्ये गेल्या वर्षी एक हजार कचराकुंडय़ा वितरित करण्यात आल्या. हिरव्या रंगाच्या या कचराकुंडय़ा आता एक तर फुटल्या आहेत आणि काही ठिकाणांहून गायब झाल्या आहेत. एकदा ठेवलेली वस्तू परत तपासण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नाही. त्यामुळे या कचराकुंडय़ांचे नक्की काय झाले, या प्रश्नाचे उत्तर देताना अधिकारी गडबडले. स्थायी समितीचे सभासद विकास जैन यांनी कचराकुंडय़ांचा हा प्रश्न उपस्थित केला. लाखो रुपये खर्चून यंत्रणा उभी केली जाते. मात्र, त्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. या कचराकुंडय़ांमध्ये कचरा पडत नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने पैसा खर्च केला गेला, तो उद्देश अयशस्वीच ठरल्याचे जैन यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून मिळालेल्या विशेष निधीतून केलेला खर्च वाया गेल्याचे या वेळी सांगण्यात आले. या अनुषंगाने महापालिकेचे तांत्रिक अधिकारी पंडित यांना खरेदी केलेल्या कुंडय़ा आणि आताची त्याची स्थिती याबाबतचा अहवाल तयार करा, अशा सूचना कुचे यांनी दिल्या. पुढच्या बैठकीत या अनुषंगाने अहवाल दिला जाणार आहे.