कापूस व्यापाऱ्याकडील १९ लाखांच्या लूट प्रकरणात दोन बालगुन्हेगारांसह एकास अटक करण्यात आली. हा आरोपी श्री गणेश अॅग्रो गणेश इंडस्ट्रीजचा मुकादम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बॅग चोरीतील ३ लाख ८३ हजार रुपये बालगुन्हेगाराच्या घरातून जप्त केले. उर्वरित रक्कम गुरू सावळे व विजय पवार यांच्याकडून लवकरच जप्त केली जाईल, असे तपासणी अधिकारी डॉ. विवेक मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लिमला येथील मारोती जििनगचे चालक आलोक शर्मा यांच्याकडील १९ लाख रुपये रक्कम चोरल्याचा प्रकार २० फेब्रुवारीला घडला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी बाबू ऊर्फ गुरू सावळे व विजय पवार (परसावतनगर) या दोघांना अटक केली. बुधवारी न्यायालयाने या दोघांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी या गुन्ह्यात विजय पवारसह मोटारसायकलवर असलेल्या दोन बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्या घरातून ३ लाख ८३ हजार रुपये जप्त केले. यातील अडीच लाख अटकेतील विजय पवारकडे, तर उर्वरित रक्कम लुटीचा सूत्रधार गुरू याच्याकडे असल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली. शहरातील व्यापारी ओमप्रकाश डागा यांच्या श्री गणेश अॅग्रो इंडस्ट्रीचे मुकादम व सूत्रधाराचा साथीदार आरोपी मुकुंद त्र्यंबक भालेराव यास बुधवारी अटक करण्यात आली. आता या गुन्ह्यात एकूण ३ आरोपींना अटक झाली असून दोन बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहेत.
सोमवारी हैदराबाद बँकेतून चोरीस गेलेल्या १ लाख ७० हजार रुपयांच्या बॅग प्रकरणाचे फुटेज मिळाले असून, यात ४ ते ५ लोकांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हे गुन्हेगार तमिळनाडूतील असावेत, अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी शहरातील अग्रवाल ज्वेलर्स यांची रोख रकमेसह ३० तोळे सोने चोरीस गेल्याच्या प्रकरणात दाखल तक्रारीची चौकशी चालू आहे. अग्रवाल यांनी दिलेली तक्रार, तोंडी जवाब यात तफावत असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत आहे, असा खुलासा त्यांनी केला. नऊ महिन्यांपूर्वी डागा यांच्या हैदराबाद बँकेसमोरून चोरी गेलेल्या २६ लाख रकमेच्या चोरीचा तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले.