चर्चगेट येथील आयकर भवनाशेजारील गल्लीमध्ये पे अ‍ॅण्ड पार्क असल्याचे सांगून वाहने उभी करणाऱ्या मुंबईकरांना प्रत्येकी १५० ते २०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघा जणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या पे अ‍ॅण्ड पार्क योजनेची मुदत फेब्रुवारी २०१३ मध्ये संपली असून नवी कंत्राटे अद्याप देण्यात आलेली नाहीत. असे असूनही आयकर भवनच्या गल्लीमध्ये वाहने उभी करणाऱ्या ग्राहकांना पप्पू रामदुलार सिंग (४५), विक्रांत शिवशंकर शर्मा (२५), वीरेंद्र रामरतन गुप्ता (३५) आणि मोहम्मद हनीफ वकील हे चौघे जण पे अ‍ॅण्ड पार्क सुरू असल्याचे सांगून फसवत होते. प्रत्येक वाहनचालकास पार्किंगचे दर वाढल्याचे सांगून १५० ते २०० रुपये आकारण्यात येत होते. या संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यावर या चौघांना अटक करण्यात आली.
हे चौघेही पूर्वी पालिकेच्या पे अ‍ॅण्ड पार्क योजनेतील कंत्राटदार होते. त्यांची मुदत २००८ मध्येच संपली होती. मात्र तरीही ते येथे हा व्यवसाय करीत होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.