वलनी माईन्स येथील एका विवाहितेच्या हुंडाबळी प्रकरणात तिच्या पती व सासूला सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मृत विवाहितेचे नाव नेहा मंगलीप्रसाद आरख (२०) असे होते. तिचा पती मंगलीप्रसाद उर्फ विशाल स्वामीदीन आरख (२३) व सासू रजुकियाबाई स्वामीदीन आरख (५६) हे दोघे या खटल्यात आरोपी होते.
भुसावळ येथील रूपसिंग ठाकूर यांची मुलगी नेहा हिचे लग्न ९ डिसेंबर २००९ रोजी वलनी माईन्स येथील विशालशी थाटाने झाले. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, काही दिवस संसार चांगला चालला. त्यानंतर व्यवसायासाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी नेहाच्या मागे तगादा लावला. तिने असमर्थता दर्शवली, तेव्हा त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. हे लोक तिला जेवणही देत नव्हते.
१९ सप्टेंबर २०११च्या रात्री आठ वाजताच्या सुमारास नेहाचा पती व सासू यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचार घेताना २१ तारखेला रात्री साडेनऊ वाजता ती मरण पावली. आपल्या मुलीला हुंडय़ासाठी जाळून मारण्यात आल्याची तक्रार नेहाचे वडील रूपसिंग ठाकूर यांनी केली. त्यावरून खापरखेडा पोलिसांनी हुंडाबळी व सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून नेहाचा पती, सासू, राजबहादूर नारायण खंगार व त्याची पत्नी आशा (रा. रोहणा) आणि नेहाची नणंद रेखा रमेश खंगार (रा. गोधनी रेल्वे) अशा पाच आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक विजय नाईक यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा तांबी यांनी खटल्याची सुनावणी केली. साक्षीपुराव्यांच्या आधारे, पती विशाल आरख व सासू रजुकियाबाई आरख यांना विवाहितेचा हुंडय़ासाठी छळ करण्याच्या आरोपाखाली २ वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व दंड न दिल्यास ६ महिने कैद, तर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ५ वर्षे सक्तमजुरी, २  हजार रुपये दंड आणि तो न दिल्यास आणखी १ वर्ष कैद अशी शिक्षा सुनावली. इतर तीन आरोपींची त्यांनी पुराव्याअभावी सुटका केली.
शिक्षा झालेल्या दोन आरोपींतर्फे रमेश गायकवाड व सुटलेल्या तीन आरोपींतर्फे चेतन ठाकूर या वकिलांनी, तर सरकारतर्फे सहायक सरकारी वकील वर्षां सायखेडकर यांनी काम पाहिले.