चित्र, शिल्प, कॅलिग्राफीचा संगम साधणाऱ्या ‘दृक्कला स्पंदन’ या सोहळ्याचा आनंद नुकताच बोरिवलीकरांनी लुटला. ‘जनसेवा केंद्र’, ‘संस्कार भारती’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या विद्यमाने प्रबोधनकार नाटय़ संकुलातील कला दालनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
सोहळ्याच्या निमित्ताने या कला दालनाचा प्रत्यक्ष कला दर्शनासाठी प्रथमच वापर करण्यात आला. सात दिवसात सुमारे चार हजार रसिकांनी सोहळ्याचा आनंद घेतला.वासुदेव कामत, प्रकाश घाटगे, विजय आचरेकर, श्री. घाटे, रवी मंडलिक, सुजाता आचरेकर, विनायक गोडकर, साहेबराव हारे, दिलीप खोमणे इत्यादी चित्रकार आणि उत्तम पाचारणे, चंद्रजीत यादव, बर्नार्ड चावीस या शिल्पकारांच्या ३५-४० कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बहुतेक कलाकार प्रत्यक्ष प्रदर्शनस्थळी उपस्थित असल्याने रसिकांना चित्राविषयीच्या उत्सुकतेचे निराकरण करून घेता आले. रसिकांना प्रत्यक्ष चित्रनिर्मितीचा किंवा शिल्पजन्माचा आनंददायी सोहळा पाहता यावा यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
‘वाद निर्माण करते ते चित्र नसून चित्रातून संवाद किंबहुना सुसंवाद साधता आला पाहिजे. तो एक संस्कार झाला पाहिजे. लहान मुलांच्या भिंतीवरील रेघोटय़ासुद्धा चित्रकलेचा हौस भागवितात आणि तिथपासूनच साधना सुरू होते,’ असे वासुदेव कामत यांनी ‘माझी भिंत आणि त्यावरील चित्र’ या विषयावर बोलताना सांगितले.
‘व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक’ हा विषय घेऊन कामत यांनी जनार्दन कामत यांना समोर बसवून कॅनव्हासवर अॅक्रीलीक रंगात त्यांचे व्यक्तिचित्र साकारले. एकूण तीन पायऱ्यांमध्ये त्यांनी हे चित्र काढले. ‘लोकप्रभे’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी ‘पुरातत्व विद्या काय व कशासाठी’ या विषयावर चित्र फितींसह विवेचन केले. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीपासून सुरुवात करीत वास्तू-नगररचना, जनसंस्कृती इत्यादीबाबत माहिती देत बोरिवलीतील कान्हेरी गुंफांच्या वैभवी काळाची माहिती दिली. सुलेखनकार अच्युत पालव यांनी ‘कॅलिग्राफी’चे प्रात्यक्षिक दिले.
विविध आकार-प्रकारचे ब्रश, रंग यांच्यात अक्षरश: खेळत त्यांनी वातावरण भारावून सोडले. चित्रकार चंद्रजीत यादव यांनी प्रत्यक्ष व्यक्तीचित्र घडवत अनामिक निर्मिकाचेच दर्शन घडविले.