गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा उपयोग सुरू होऊन अनेक वर्षे झालीत. स्वच्छ, सुरक्षित आणि कोणत्याही गोंधळाविना विसर्जनाचा आनंद देणाऱ्या या तलावांनी नसíगक पाणवठय़ांना नवे जीवदान दिले आहे. या वर्षी प्रथमच आरे कॉलनीच्या तलावाला पर्याय म्हणून कृत्रिम तलाव उपयोगात आणला जाणार आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच वाहतूक कोंडीचीही समस्या कमी होईल. मालाड- जोगेश्वरी पट्टय़ात पूर्वेकडे राहणाऱ्या भक्तांकडील गणेशांचे विसर्जन होते ते आरे कॉलनीतील तलावात. दीड दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत आणि घरगुतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंतचे अनेक गणेश आरे कॉलनीतील तलावातून घरचा प्रवास सुरू करतात. गेल्या वर्षी या तलावात सुमारे साडेसहा हजार घरगुती आणि दीडशेहून अधिक सार्वजनिक गणेशांचे विसर्जन झाले. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे वर्षांनुवष्रे होत असलेल्या विसर्जनामुळे या तलावातील गाळ वाढला असून त्यामुळे येथील परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वेळी पर्यावरणाच्या रक्षणासाठी नवे पाऊल उचलले गेले आहे. छोटा काश्मीरच्या जवळच असलेल्या या दीड एकर परिसरातील तलावात वर्षांनुवष्रे होत असलेल्या गणेश विसर्जनाला या वेळी पर्याय मिळणार आहे ती कृत्रिम तलावाची. आरे दुग्धविकास विभागाने याबाबत पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या वॉर्ड पातळीवर झालेल्या बठकीत या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत यांनी कृत्रिम तलावाचा विचार मांडला व त्याला तातडीने परवानगीही मिळाली. या तलावासाठी प्रवेशद्वाराजवळ जागा शोधण्यात आल्या असून त्यासंबधी पालिकेला कळवून पुढील कार्यवाही सुरू होईल. त्यामुळे आरे कॉलनीतील रस्त्यांवर होत असलेली वाहतूक कोंडीही कमी होईल. प्रवेशद्वाराजवळ एक कृत्रिम तलाव तयार केला जाणार असून दोन ते तीन ठिकाणी लहान गणपतींसाठी पाण्याच्या टाक्या ठेवल्या जातील. आरे कॉलनीच्या तलावात येणारे ८० टक्के घरगुती लहान मूर्तीचे विसर्जन या व्यवस्थेमार्फत होईल. मोठय़ा मूर्तीचे विसर्जन आरे तलावात केले जाईल, अशी माहिती गजानन राऊत यांनी दिली.पालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी प्रयत्नपूर्वक रुजवलेल्या कृत्रिम तलावांच्या संकल्पनेला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले आहे. नसíगक पाणवठय़ांची प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होत असलेली हानी रोखण्यात कृत्रिम तलावांमुळे यश आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच रासायनिक रंगांमुळे पाणी दूषित होऊन त्यातील जीवांना धोका पोहोचतो. पर्यावरण रक्षणाच्या हेतूने पालिकेने गेल्या वर्षी शहरातील बहुतांश वॉर्डमध्ये कृत्रिम तलावाची सोय उपलब्ध करून दिली. या तलावांमध्ये गेल्या वर्षी वीस टक्के गणेशांचे विसर्जन करण्यात आले. शहरात दरवर्षी सुमारे एक लाख गणेशमूर्तीचे विसर्जन होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial ponds for immersion in aare colony
First published on: 29-08-2015 at 05:05 IST