अशोक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना राबविणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी दिली.
कारखान्याने जैन व नेटाफेम या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून प्रतिएकर ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त २० हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे भरायचे आहेत. उर्वरित रकमेत कर्ज स्वरूपात कंपनीचा सहभाग असणार आहे. सदरच्या ५० टक्केरकमेच्या वसुलीसाठी कारखाना हमी देणार आहे. ४० हजारांपेक्षा अधिक खर्च आल्यास तो लाभार्थीने करायचा आहे. कर्जाची रक्कम १६ महिने कालवधीपर्यंत बिनव्याजी असणार असून त्यानंतर १५ टक्के व्याज आकारणी केली जाईल, असे गलांडे यांनी सांगितले.
सरकारी नियमाप्रमाणे ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम ही यावर्षीपासून शेतकऱ्यांच्या नावावर निघणार असल्याने लाभार्थीच्या २०१३-१४च्या गळीत हंगामास येणाऱ्या उसाच्या पहिल्या पेमेंटमधून अथवा संबंधीत लाभार्थीचे अनुदान यापैकी जे आधी जमा होईल त्यातून कर्जाच्या रकमेची वसुली करण्यात येईल. या योजनेत पाच एकरापर्यंत लाभार्थीला ठिबक करता येईल. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना अडचणी आल्यास कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.