मुलींची खो-खो मध्ये आश्चर्यकारक कामगिरी *   जिल्हा संघातील सर्व खेळाडू आश्रमशाळेचे
शर्मिला असो किंवा रेश्मा..शांता असो किंवा अनिता..कविता राऊतप्रमाणे या नावांना अद्याप वलय प्राप्त झालेले नसल्याने ही नावे कोणाला माहीत असण्याचे फारसे कारणही नाही. यापैकी कोणाचे वडील शेतमजूर तर कोणाच्या कुटुंबाची गुजराण अल्पशा शेतीवर. त्यामुळे घरची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज करणे सहजशक्य. आर्थिक परिस्थितीची असलेली साम्यता या सर्वाना एका पातळीवर आणण्यात कारणीभूत ठरली आहे. त्यामुळेच राज्य पातळीवर संपूर्ण जिल्ह्याचा भार वाहणाऱ्या मुलींच्या खो-खो संघातील सदस्य म्हणून मिरविण्यात त्यांना अभिमान वाटत आहे.
अलंगुण, नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात डोंगरांच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. सुरगाण्यापासून दहा किलोमीटरवर असलेल्या या गावात आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संस्थेचा शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असा पसारा आहे. या आश्रमशाळेचे नाव सध्या राज्य स्तरापर्यंत घेतले जात असून त्यास आश्रमशाळेचा मुलींचा खो-खो संघ कारणीभूत ठरला आहे. मागील वर्षी आणि यंदाही राज्यस्तरीय १९ वर्षांआतील शालेय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिल्हा संघात सर्वच्या सर्व मुली या एकाच आश्रमशाळेच्या आहेत. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. यंदा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या स्पर्धेत नागपूरला डावाने लोळवीत या संघाने उपांत्य फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीत मात्र त्यांना लातूरविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत विद्यालयाने तिसरा क्रमांक मिळविला होता.
आश्रमशाळेच्या खो-खोमधील आश्चर्यकारक कामगिरीचे श्रेय खेळाडूंप्रमाणेच त्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांनाही द्यावे लागेल. प्राथमिक आश्रमशाळेचे विजय वाघेरे, प्रवीण बागुल, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे एन. जी. लांडगे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे क्षीरसागर या सर्वानी त्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत आहेत. विशेषत: स्वत: क्रीडा शिक्षक नसतानाही केवळ आश्रमशाळेच्या मुलींनी राज्यस्तरापर्यंत धडक द्यावी, यासाठी कष्ट घेणारे आर. डी. चौधरी यांचा त्यात अधिक वाटा. हिंदी व इतिहास विषय शिकविणारे चौधरी सर येथे बी.पी.एड्. शिक्षक नसल्याने केवळ आवड म्हणून खो-खो शिकवीत आहेत. मुख्याध्यापक ए. एल. देवरे, उच्च माध्यमिक विभागाचे व्ही. के. शिंदे यांच्याकडून त्यासाठी त्यांना सहकार्य केले जाते. सकाळी सहा ते साडेआठ आणि सायंकाळी पाच ते सात असा विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुटीव्यतिरिक्त यात सहसा खंड पडत नाही. अगदी पावसाळ्यात चिखलातही सराव केला जातो. खेळाडूंना सरावाच्या वेळी काही दुखापत झाल्यास पळसन किंवा सुरगाण्यात उपचारासाठी पाठविले जाते. दुखापत गंभीर नसल्यास वनौषधींच्या पाल्यानेही काम भागते, असे चौधरी यांनी सांगितले. आक्रमण आणि डावपेचात आमच्या मुली कमी पडत असून या त्रुटी दूर करण्यासाठी पुण्याचे विजय शिंदे हेही वेळोवेळी येथे येऊन मार्गदर्शन करतात. अर्थात त्यासाठी नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख यांचे प्रयत्न कारणीभूत ठरल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. या विद्यार्थिनींना त्यांच्याच भाषेत मार्गदर्शनाचे बोल ऐकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला आमंत्रित करण्यात आले होते.    
राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या १९ वर्षांआतील महाराष्ट्राच्या शालेय संघाचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य जिल्हा संघाची कर्णधार शर्मिला चौधरी हिला मिळाले आहे. जिल्हा संघाच्या दृष्टीने डावपेच हीच चिंतेची बाब असल्याचे तिचे म्हणणे. त्यातच बारावीनंतर संघातील काही मुली बाहेरगावी जात असल्याने संघाची बांधणी बळकट होत नसल्याचा मुद्दा तिने मांडला. बाहेर पडणाऱ्या मुलींची जागा घेऊ शकतील, अशा मुली तयार होण्याची गरज शर्मिलाने व्यक्त केली. आश्रमशाळेच्या या संघात शर्मिलाशिवाय रेश्मा म्हसे, अनिता म्हसे, शांता पाडवी, आशा म्हसे, देवकी धूम, पार्वती हाडळ, माधुरी चौधरी, मालती गायकवाड, भारती गुंबाडे, पद्मावती चौधरी, सरस्वती सहारे यांचा समावेश आहे. अकरावीमध्ये (विज्ञान) असलेल्या शर्मिलाने अॅथलेटिक्समध्येही चमक दाखवली आहे. अलंगुनपासून ३५ किलोमीटरवर असलेले खोबळाजवळील वडपाडा हे तिचे गाव. घर संपूर्णपणे शेतीवर अवलंबून. आई-वडील, पाच भाऊ आणि एक लहान बहीण हे घरातील सदस्य. मुळात या संघातील सर्वच मुलींच्या घरची परिस्थिती सारखीच. घरातील एकही सदस्य नोकरीस नाही. त्याचा परिणाम घरातील आर्थिक स्थितीवर होत असून त्यावर मात करण्याची जिद्द या मुलींमध्ये खो-खोमधून निर्माण होत आहे. संस्थाचालकांकडून मिळणारी साथ त्यासाठी उपयुक्त ठरत असली तरी ही साथ सर्व दृष्टीने अधिक बळकट होण्याची गरज आहे.