उपमहापौर जोशी यांचा आरोपमालमत्ता वसुलीच्या खासगीकरणाची निविदा काढताना प्रशासनाने टाकलेल्या जाणीवपूर्वक अटीमुळे हे काम ठराविक ठेकेदारास मिळावे, अशी प्रशासनाची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप उपमहापौर संजय जोशी यांनी केला. त्यांनी तसे पत्रही महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.खासगीकरणाच्या निविदेत दरवर्षी महापालिका क्षेत्रातून ५० कोटी वसूल करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारालाच पात्र ठरविण्याची अट टाकली आहे. ही अट निविदेतून काढली नाहीतर निकोप स्पर्धा होणे शक्य नाही, असे जोशी यांनी म्हटले आहे. महापालिकेतील कर्मचारी मालमत्ता कर पुरेसा वसूल करीत नाही. ही यंत्रणाच तोकडी पडत असल्याने मालमत्ता करवसुलीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची निविदा तयार करताना वसुलीच्या रकमेबरोबरच अनुभव व संयुक्त ठेकेदारीस मनाई करण्याची अट टाकली आहे. यावरून मालमत्ता खासगीकरणाचा ठेका विशिष्ट एजन्सीला देण्याचा उद्देश दिसून येत असल्याचे त्यांनी आयुक्ताला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या दोन्ही अटी शिथिल करून निविदा भरण्यापूर्वी ही बाब ठेकेदारांच्या लक्षात आणून द्यावी तरच स्पर्धा होईल व महापालिकेचे उत्पन्न वाढेल, असे जोशी यांनी सांगितले. असाच प्रकार जकात ठेक्याच्या वेळीही करण्यात आला होता. तेव्हाही भाजपने आक्षेप नोंदविल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.