विक्रीसाठी झाडांवर खुणा, कापणी व पुढील कार्यवाहीसाठी एका लाकुड कंत्राटदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया येथील एका सहायक वन संरक्षकास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी पकडले.
दिलीप श्याम टेकाडे हे पकडलेल्या आरोपीचे नाव असून तो गोंदिया वनवृत्तात सहायक वन संरक्षक आहे. जंगलातील झाडांवर खुणा करून मग त्याची कापणी करावी लागते. त्यानंतर पुन्हा कापलेल्या लाकडावर खुणा करून त्याचा वाहतूक परवाना तयार करावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक ते सर्व शुल्क गोंदिया जिल्ह्य़ातल्या तिरोडा तालुक्यात राहणाऱ्या एका कंत्राटदाराने वन खात्यात भरले होते.
या प्रक्रियेसाठी या कंत्राटदाराने गोंदियातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात जाऊन दिलीप टेकाडे याची शुक्रवारी भेट घेतली. सहायक वन संरक्षण असलेल्या टेकाडे यांच्याकडे गोंदिया वनवृत्तातील रोहयो कामांसह तिरोडा विभागाचाही अतिरिक्त पदभार आहे.
टेकाडे यांनी या प्रक्रियेसाठी तेरा हजार रुपयांची मागणी केली. एवढे शक्य नसल्याचे म्हटल्याने टेकाडे यांनी दहा हजार रुपये घेऊन २ फेब्रुवारीस बोलावले.
कंत्राटदाराने भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक प्रकाश जाधव यांची भेट घेऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा झाल्यावर जाधव यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक दिनकर ठोसरे व पोलीस निरीक्षक प्रदीर घोंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज गोंदियातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात सापळा रचला. कंत्राटदाराकडून टेकाडेने दहा हजार रुपये स्वीकारल्यानंतर इशारा मिळताच त्याला या पथकाने पकडले.