महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीचा वाद संपुष्टात आल्याचा दावा केला जात असला तरी शिरपूर शहरात मात्र नव्याने नियुक्त झालेल्या शहर उपाध्यक्षावरच हल्ला चढविण्यात आला. नाराज गटाने हा हल्ला केल्याचा आरोप असून हल्लेखोर कार्यकर्त्यांनी शहर उपाध्यक्षाच्या खिशातून पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप आहे. दुसऱ्या गटाने सोन्याची चेन व अंगठी काढून घेतल्याची तक्रार केली आहे. या तक्रारींवरून पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.मनसेच्या शिरपूर शहर उपाध्यक्षपदी किशोर बन्सीलाल जाधव यांची निवड झाली. यामुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना घराबाहेर बोलावून मारहाण केली. मंगळवारी रात्री आठ वाजता जनता शाळेजवळ हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी आपल्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले, असे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात राजु अण्णा गुलाबसिंग गिरासे, अमोल दरबारसिंग राजपूत, मुकेश मनोहर पाटील, योगेश सुरेश बागूल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी दुसऱ्या गटाने पोलिसात तक्रार दिली आहे. शिरपूर येथील मनसेच्या कार्यालयात गर्दी करून पाच ते सहा जणांनी मयुर राजपूत याच्या खिशातील रोकड काढून घेतली. काही जणांची सोन्याची चेन व अंगठी काढून घेण्यात आली. निमझरी नाक्यावर हा प्रकार घडला. राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत राजपूत, राकेश चौधरी, महेश जाधव, किशोर जाधव, हेमंत कुवर याच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मनसेचे निरीक्षक तथा माजी आमदार जयप्रकाश बावीस्कर यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात अन्य ठिकाणी नाही, पण शिरपूर शहरात मात्र मनसेचा नाराज गट सक्रिय झाल्याचे या हल्ल्यावरून उघड झाले आहे.