बेकायदा चालणाऱ्या खासगी रिक्षा व टॅक्सींवर बंदी घालावी, हकीम समिती बरखास्त करू नये यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी मुंबई ऑटोरिक्षा युनियनने राजव्यापी बंद पुकारला होता. या बंदला नवी मुंबईत मात्र अल्प प्रतिसाद मिळाला. शिवसेनेसह इतर संघटनांनी या प्रवाशांच्या हितासाठी बंदमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या.
नवी मुंबई रिक्षा महासंघाने बंदची हाक दिली होती, परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नवी मुंबईमधील रिक्षाचालक संघटनामध्ये एकवाक्यता नसल्याने यावरून दिसून आले. रिक्षासेवा बंद करून प्रवाशांना वेठीस धरू नये, अशी भूमिका घेत शिवसेनेसह अनेक संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या नाहीत.
नवी मुंबईतील रिक्षा महासंघाच्या रिक्षाचालक-मालकांबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या. नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखरणे, वाशी, सीबीडी या ठिकाणी तुरळक रिक्षा बाहेर पडल्या. त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. दुपारनंतर रिक्षाचालकांनी आपली सेवा दिल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला.
रिक्षाचालकांनी आपल्या मागण्यांसाठी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा करणे हे कायदेशीर आहे. मात्र अशा प्रकारे बंद पुकारून वेठीस धरणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रतिभा जाधव या विद्यार्थिनीने दिली. तर एमआयडीसी भागामध्ये कोपरखरणे येथून शेअर रिक्षा जात नाही. मी नियमितपणे मीटर रिक्षाने जातो. मात्र आज मीटर रिक्षादेखील नसल्याने सकाळी कामावर चालत जावे लागले. रिक्षाचालकांनी चर्चेने विषय सोडवावा, अशी संगम गायकवाड या कामगाराने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.