दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदा पावसाळ्यात पावसाची चांगली साथ मिळत असून बहुसंख्य तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली तरीही जिल्ह्य़ातील दुष्काळ संपत नाही व त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्याही तेवढय़ा प्रमाणात घटली नसल्याचे दिसून येते. दुष्काळाची तीव्रता असताना जिल्ह्य़ात ६७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला, तर आता पावसाळ्यात टँकरची संख्या ६३८ इतकी आहे. केवळ ३२ टँकर कमी झाल्याचे दिसून येते. तर मंगळवेढा व सांगोला परिसरात चारा छावण्यांची स्थिती कायम असून जिल्ह्य़ात त्यांची संख्या केवळ ४८ ने घटली आहे.
सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्य़ात दुष्काळाची भीषणता कायम राहिल्याने पाण्याचे टँकर व मुक्या जनावरांसाठी चारा छावण्यांची सोय करण्यात आली होती. जिल्ह्य़ात दुष्काळामध्ये ५१०गावे व २८३० वाडय़ा-वस्त्यांतील १२ लाख ६० हजार १६९ लोकसंख्येला सर्वाधिक ६७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यात सर्वाधिक ९४ टँकर एकटय़ा माढा तालुक्यात तर त्या खालोखाल ९३ टँकर सांगोला तालुक्यात कार्यरत होते. याशिवाय पंढरपुरात ९० तर  मंगळवेढय़ात ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. याशिवाय मोहोळ-७७, करमाळा-७५, माळशिरस-४१, अक्कलकोट-३९ याप्रमाणे विविध तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाण्याचे टँकर फिरत होते.
दरम्यान, यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस पडत असल्याने परिस्थिती बदलली आहे. मात्र तेवढय़ा प्रमाणात टँकर व चारा छावण्यांची संख्या घटणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात टँकर व चारा छावण्यांच्या संख्येत किंचित घट झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या जिल्ह्य़ात ११ लाख ८५ हजार ५१ बाधित लोकसंख्येची ४८२ गावे व २६६१ वाडय़ा-वस्त्यांना ६३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक ९३टँकर माढा तालुक्यात तर ८७ टँकर सांगोल्या व ८६ टँकर मंगळवेढय़ात आहेत. पंढरपूर-८५, मोहोळ-७६, करमाळा-६९, माळशिरस-४०, अक्कलकोट-३९ याप्रमाणे कमी-जास्त संख्येने टँकरद्वारे पाणीपुरवठा चालूच आहे.
सर्वाधिक टँकर असलेल्या माढा तालुक्यात सिंचनाच्या योजनांमुळे अर्थात उसाचे प्रमाण लक्षणीय आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत या तालुक्यात १४१.५४ मिमी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल २४५.५० मिमी पाऊस (५२.७३ टक्के) बरसला आहे. परंतु तरीदेखील या तालुक्यात टँकरची असलेली ९३ संख्या कायम आहे. याशिवाय याच तालुक्यात मनरेगाची ९९ कामे सुरू असून त्यावर तब्बल २८३८ मजूर काम करीत आहेत. दमदार पाऊस पडत असताना चिखलात रोहयोच्या कामांवर मजुरांची उपस्थिती हासुध्दा चर्चेचा विषय बनला आहे.
पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्य़ात १५४.१९ मिमी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १६८.५४ मिमी इतका समाधानकारक पाऊस झाला आहे. यात अपवाद केवळ सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या चार तालुक्यांचा आहे. उत्तर सोलापूर-२१६.१०, दक्षिण सोलापूर-१५६.४८, बार्शी-१७७.३१, अक्कलकोट-१८३.१२, पंढरपूर-१५५.२९, मंगळवेढा-१०९.६५, सांगोला-१०९.१६, माढा-२४५.५०, मोहोळ-१६२.१२, करमाळा-१५२.३४ व माळशिरस-१८४.८७ याप्रमाणे पावसाने साथ दिली आहे. एकूण ३४.४८ टक्के पाऊस पडला आहे. तथापि, पडलेल्या पावसाच्या तुलनेने टँकर व चारा छावण्यांची संख्या घटली नाही. तसेच रोहयोची कामेही पावसाळ्यात कमी-जास्त प्रमाणात चालूच आहेत. जिल्ह्य़ात सध्या ४५८ कामे सुरू असून त्यावरील मजुरांची उपस्थिती ७६९८ एवढी आहे. यात सर्वाधिक मजुरांची संख्या एकटय़ा माढा तालुक्यात आहे. तर दुष्काळी सांगोल्यात केवळ १६ कामे सुरू असून त्यावर अवघे ३६५ मजूर कार्यरत आहेत. तर मंगळवेढा येथेही जेमतेम ३४ कामे सुरू असून त्यावर केवळ २३६ मजूर उपस्थित असल्याचे दिसून येते.
चारा छावण्याची संख्या दुष्काळात ३२४ वर गेली होती. परंतु त्यात केवळ ४८ ने घट होऊन ती आता २७५ इतकी झाली आहे. सांगोला तालुक्यात ९६, मंगळवेढय़ात ७९, तर माढा येथे ४१ चारा छावण्या होत्या. सांगोल्यात केवळ चारा छावणी बंद झाली तर मंगळवेढय़ात ६, माढय़ात १२, करमाळा-६, पंढरपूर-८, बार्शी व माळशिरस-प्रत्येकी १, उत्तर सोलापूर-२ व दक्षिण सोलापूर-४ याप्रमाणे चारा छावण्या बंद झाल्या आहेत.