राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या ५०० जागा असून त्यापैकी एक जागाही कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यात येईल. तसेच रोजंदारी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरली जातील. जेथे आवश्यक आहे, तेथे नवीन इमारती बांधल्या जातील. काही वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांच्या इमारती बांधण्याची आवश्यकता आहे. त्या बांधण्यात येतील. ज्या वैद्यकीय महाविद्यालयांत यंत्रसामुग्री नाही, तेथे यंत्रसामुग्री दिली जाईल. ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. तसेच ई-लायब्ररी चोवीस तास सुरू ठेवण्यात याव्यात, असे आदेशही आव्हाड यांनी अधिष्ठात्यांना दिलेत.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील उमेदिचे दिवस वसतिगृहातच जातात. त्यामुळे या वसतिगृहात कॅन्टींग, रिडिंग रुम, वैयक्तीक किंवा सामूहिक स्वच्छतागृह उपलब्ध करून दिलेच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, पंखे, कुलरही असलेच पाहिजे. वसतिगृह म्हणजे घर वाटले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी महिन्यातून एकदा त्यांच्या वसतिगृहात जाऊन फेरफटका मारावा. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. असे झाल्यास अधिष्ठाता आणि विद्यार्थ्यांमधील अंतर कमी होईल. आकस्मिक रुग्ण विभागात आवश्यक त्या सोयी उपलब्ध नसतात. त्यामुळे गोल्डन अवरमध्ये रुग्णांना उपचार मिळत नाही. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आकस्मिक रुग्ण विभागात बसवली जातील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते.  तत्पूर्वी, त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विभागाला भेट देऊन पाहणी केली.
मेयोतील कार्यक्रमानंतर डॉ. आव्हाड यांनी मेडिकलला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे उपस्थित होते. याप्रसंगी मेडिकलमधील स्नातक, स्नातकोत्तर व नर्सिगच्या विद्यार्थ्यांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचला. या समस्या सोडवण्याचे आश्वासीत करून डॉ. आव्हाड यांनी अधिष्ठात्यांना संवेदनशील होऊन आपल्यामध्ये बदल घडून आणण्याचे आवाहन केले. मेडिकलमधील कार्यक्रमास आमदार दीनानाथ पडोळे, आमदार प्रकाश गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.