‘साकार गंधार हा’

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांची स्थिती काहीशी सुधारली असली तरी त्यातील संगीताची अवस्था मात्र फारशी उत्साहवर्धक नाही. अशावेळी दर्जेदार संगीत देण्याचा ध्यास घेतलेल्या संगीतकारांसाठी भावगीतांचा पर्याय श्रेयस्कर ठरतो. श्रीधर फडके यांनी गेली काही वष्रे हा मार्ग निवडलेला दिसतो. त्यांच्या ‘ऋतु हिरवा’ या ध्वनीफीतीने इतिहास घडवला, आशा भोसले यांनी त्या गाण्यांचं सोनं केलं. हीच जोडी तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आली आणि ‘व्हीएसएस मल्टीमीडिया’ निर्मित ‘साकार गंधार हा’ ही नवी ध्वनीफीत साकारली.
या नव्या ध्वनीफीतीतील पहिलंच गाणं म्हणजे ‘साकार गंधार हा, की मूर्त मंदार हा’, हे शीर्षक गीत दिलखेचक झालं आहे. शांता शेळके यांच्या शब्दकळेसाठी फडके यांनी चंद्रकंस, जोगकंस व मालकंस असे मिश्र राग योजले आहेत. धृपद धमारमधील नोम-तोमचा वापर कोरसकडून करुन घेत फडके यांनी या गाण्याचं सौदर्य खुलवलं आहे. ८०व्या वर्षांत पदार्पण केलेल्या आशाजींचा दमसाँस, ताना, हरकती सारंच थक्क करणारं आहे. ‘भूलवी तनमन’ हे अरुणा ढेरे यांनी लिहिलेलं गाणंही उत्तम वठलं आहे.
इंदिरा संत यांची ‘रुतत चालले तिळातिळाने, रुतले तळवे, रुतले पाऊल’ ही कविता खरं तर मुक्तछंदातील. या काव्याला संगीतसाज चढविताना फडके यांनी त्यातील आशयाला धक्का लावलेला नाही. गाण्याच्या सुरुवातीला वाळवंटाचा आभास निर्माण करणारं संगीत दाद देण्याजोगं! यात पियानोचाही चांगला वापर केला आहे. ‘अंतरी मधुमधूर सूर यावा’ हे नितीन आखवे यांचं गीतही श्रवणीय झालं आहे, त्यावर फडके यांच्याच ‘घनरानी’ या गाण्याची काहीशी छाप वाटते, मात्र ते तेवढय़ापुरतंच. तिलक कामोदमधील या रचनेतील सारंगीचे तुकडे ऐकण्यासारखेच.
कवी ग्रेस यांच्या ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ या गाजलेल्या काव्यसंग्रहातील ‘मंदिरे सूनी सूनी कुठे न दीप काजवा, मेघ वाही श्रावणात ये सुगंधी गारवा’ या कवितेला शांतरसातील उत्तम चाल लाभली आहे. या ध्वनीफीतीची तयारी पूर्वीपासून सुरू असल्याने ही चाल तब्बल १७ वर्षांपूर्वीची आहे. चित्रपटगीत शोभेल असं ‘सख्या रे हे स्वप्न की सत्य रे’ हे गीत प्रेमात पडलेल्या तरुणीचं मनोगत आहे. आशाजींनी ते उत्तम गायलं आहे, मात्र निसर्ग आपलं काम करत असल्याने वयपरत्वे हा नवथर भाव त्यांच्या गायकीत विजोड वाटतो, हे सत्य आहे. फडके यांच्या आधीच्या एका ध्वनीफीतीत आलेलं ‘सजणा पुन्हा स्मरशील ना’ हे गीत यात आशाजींच्या आवाजात ऐकायला मिळतं. यात समेवर येताना त्यांनी अप्रतिम हरकती व ताना घेतल्या आहेत, मात्र ते त्यांनी नेहमीपेक्षा एक-दोन स्वर खालच्या पट्टीत गायल्याने काहीसा रसभंग होतो. केवळ हेच गाणं नाही तर यातील बहुतांश गाणी त्यांच्या सध्याच्या आवाजाचा विचार करुन खालच्या पट्टीत स्वरबद्ध केली आहेत, हे जाणवल्याशिवाय रहात नाही. मात्र, या ध्वनिफीतीने मराठी भावसंगीताची श्रीमंती वाढवली आहे, यात शंका नाही.
‘मुरली मनोहर रे’  
आषाढी एकादशीचा योग साधत फडके यांचा ‘मुरली मनोहर रे’ ही भक्तीरसात चिंब झालेली नवाकोरी ध्वनीफीत रसिकांसमोर सादर केली आहे.
‘व्हीनस कॅसेट’च्या या ध्वनीफीतीत सुरेश वाडकर, शंकर महादेवन, जयतीर्थ मेवुंडी, उपेंद्र भट आणि यज्ञेश्वर िलबेकर या गायकांनी एकूण नऊ अभंग गायले आहेत.
यातील काही अभंग पंडित भीमसेन जोशी यांनी गाव्यात अशी फडके यांची इच्छा होती. त्यातील तीन अभंगांच्या तालमीही झाल्या. पंडितजींना त्या रचना खूपच आवडल्या होत्या, मात्र त्यांचा आजारपणामुळे ती योजना बारगळली. या घडामोडी १९९५ मधील आहेत म्हणजे या चाली किती मुरलेल्या आहेत, हे पाहा. मराठी गाणी लीलया गाणाऱ्या शंकर महादेवनने ‘भजनभावे गाऊ’ या पूरिया धनाश्रीच्या सुरावटीतील रचनेत गायलेली सरगम दाद देण्यासारखी झाली आहे. त्याच्याच स्वरात ‘मुरलीमनोहर माधव दीनदयाळघन’ ही रचना ‘यमन’ या सदाबहार रागाची श्रीमंती घेऊन येते. हे दोन्ही अभंग संत एकनाथांच्या समर्थ लेखणीतून उतरले आहेत. श्रीधर फडके यांचे आवडते व हक्काचे गायक सुरेश वाडकर यांनी संत ज्ञानेश्वरांचा ‘आवेगे ध्यान जननी’ हा शुद्ध कल्याणमधील अभंग त्यांच्या नेहमीच्या सुरेल शैलीत सादर केला आहे. त्यांच्याच आवाजातील ‘उदार धीर निधी’ हा एकनाथांचा अभंगही तितकाच श्रवणीय झाला आहे. दरबारी कानडय़ातील या अभंगात कोरसचा उपयोगही प्रभावीपणे करण्यात आला आहे.
किराणा घराण्याची श्रीमंती पुढे नेणाऱ्या जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘गायनाचे रंगी’ या तुकारामांच्या अभंगात आपल्या पहाडी गायकीचा प्रत्यय दिला आहे. भीमसेनजींचे आणखी एक शिष्य असणाऱ्या उपेंद्र भट यांनी ‘कृपेच्या सागरा भक्तजन करुणाकरा’ या संत नामदेवांच्या अभंगाला न्याय दिला आहे. यज्ञेश्वर िलबेकर यांनी ‘विठ्ठल नाम छंदे, नाचेन आनंदे’ हा संत एकनाथांचा अभंग जीव ओतून गायला आहे. विठ्ठलदर्शनाची आस बाळगणारे वारकरी ज्या उत्साहाने, उडय़ा मारत िदडीत सहभागी झालेले असतात तो मूड फडके यांनी या रचनेत अचूकपणे टिपला आहे. या ध्वनीफीतीचे वैशिष्टय़ म्हणजे सुरेश वाडकर व शंकर महादेवन यांचे द्वंद्वगीत! ‘आषाढी पर्वकाळ, विठ्ठल कीर्तनी’ ही एकनाथांची रचना या दोघांनी एकत्रित गायली आहे. चंद्रकंसातील ही रचना गाताना दोघांमधील ताळमेळ दाद देण्यासारखा झाला आहे. याच दोघांनी ‘तू उदारांचा राव रे’ हा तुकारामांचा अभंगही एकत्र गायला आहे. यासाठी फडके यांनी कल्पकपणे लोकगीताचा बाज वापरला आहे.  टाळ-मृदुंगासह, सरोद, सतार, व्हायलीन, बासरी आदी वाद्यांमुळे या सर्व रचना वेगळ्याच उंचीवर पोहोचल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त निर्माण होणा-या नादब्रह्मात फडके यांनी चांगलीच भर टाकली आहे.  

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..