ठाणे येथील मर्फी कंपनीजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी होऊ लागली असून आरटीओ कार्यालयाच्या आशीर्वादाने झालेली ही कोंडी आता थेट सेवा रस्त्यांच्या मुखापर्यंत येऊन पोहोचल्याने सर्वसामान्य ठाणेकर हैराण झाले आहेत. ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनाही या कोंडीवर उतारा शोधणे जमले नसून महामार्गाच्या कडेला बिनधोकपणे अवजड वाहने उभी राहू लागल्याने या ठिकाणी जागोजागी जकात नाक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे अतिक्रमण होत असताना परिवहन अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर झापडे धारण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाणे सेंट्रल जेल परिसरात आरटीओचे जुने, तर मर्फी कंपनीजवळ नवे कार्यालय आहे. जुन्या कार्यालय परिसरात वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. नव्या कार्यालयाजवळ मात्र मोठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे नव्या कार्यालयात वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येते. असे असले तरी आरटीओच्या नियोजन शून्यतेमुळे कार्यालयाशेजारीच असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांचा चक्काजाम होऊ लागला असून या ठिकाणी अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. काही अवजड वाहने दुहेरी रांगांमध्ये उभी करण्यात येत असल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची कोंडी होऊ लागल्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यामध्ये परवाना नूतनीकरणासाठी महामार्गावर रांगेत उभे राहणाऱ्या ट्रकसंबंधी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी आरटीओच्या कार्यपद्धतीत बदल केले. दुपारी दोननंतर सुरू होणारी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू केली. शिवाय त्यासाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यांच्यामार्फत ट्रक आणि कागदपत्रांची जागेवर जाऊन तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे महामार्गावर ट्रकच्या रांगा लागत नव्हत्या. मात्र हेमांगिनी पाटील यांची जुन्या कार्यालयात बदली होताच त्यांच्या जागी आलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी या कार्यपद्धतीत पुन्हा बदल केले आणि यापूर्वी असलेली कार्यपद्धती राबविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, मुंबई-नाशिक महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आरटीओच्या नव्या कार्यपद्धतीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर झाल्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. जुनी कार्यपद्धत पुन्हा लागू करण्यात आल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.
नव्या जागेचा शोध..
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ट्रक, ट्रेलर, टेम्पो, रिक्षा अशी दिवसाला सुमारे ३५० वाहने परवाना नूतनीकरणासाठी येतात. प्रशस्त जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी अडचणी येतात. तसेच वाहने येतात, पण त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होण्यास विलंब होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे उशिरा येतात. तसेच यापूर्वी वाहनांची पुन्हा तपासणी करावी लागत नव्हती. पण तपासणी करण्यासाठी कार्यपद्धतीत पुन्हा बदल केले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, असे स्पष्टीकरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिले.