वेगळ्या विदर्भासाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंच लोकसभेच्या रिंगणात – सुलेखा कुंभारे

वेगळ्या विदर्भाच्या मागणीस काँग्रेस, भाजप तसेच आम आदमी पक्षानेही गांभीर्याने घेतले नसून वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीने जे कामाचे नाहीत त्यांना हद्दपार केले पाहिजे

वेगळ्या विदर्भाच्या मागणीस काँग्रेस, भाजप तसेच आम आदमी पक्षानेही गांभीर्याने घेतले नसून वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीने जे कामाचे नाहीत त्यांना हद्दपार केले पाहिजे. किंबहुना वेगळ्या विदर्भासाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंच विदर्भातील सर्व मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे मंचच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
लोकसभेत तेलंगणा विधेयक संमत झाले. तेलंगणाच्या मागणीस प्रखर विरोध असूनही तेलंगणासाठी काँग्रेस सरकार आग्रही होते. शिवसेना सोडली तर इतर कुठल्याच पक्षांचा विरोध नव्हता. स्वतंत्र विदर्भाची मागणी साठ-सत्तर वर्षे जुनी असून ती शांततेच्या मार्गाने केली जात आहे. प्रखरआंदोलनास सरकार पाठिंबा देते, शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनास नाही, असाच याचा अर्थ निघतो. त्यामुळे बहुजन रिपब्लिकन एकता मंच विदर्भासाठी प्रखर आंदोलन करणार आहे. तशी तयारी आहे. त्यापूर्वी सोनिया गांधी यांना एक निवेदन दिले जाईल, असे सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.
मुळात स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव काँग्रेस अथवा भाजपने संसदेत का मांडला नाही, असा सवाल करून कुंभारे म्हणाल्या, हे दोन्ही पक्ष विदर्भाची मागणी करीत असले तरी ती गांभीर्याने करीत नाहीत. अनेक प्रस्थापित खासदार वा लोकप्रतिनिधींनी ही मागणी गांभीर्याने कधीच केली नाही. त्यामुळे जे कामाचे नाहीत त्यांना  हद्दपार केले पाहिजे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंचने लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील दहाही मतदारसंघात बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे उमेदवार राहतील. रामदास आठवले केवळ एका राज्यसभेसाठी शिवसेनेसोबत युती करतात त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भाची मागणी करतात, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. भ्रष्टाचार, महागाई तसेच अंधाराविरुद्ध बहुजन रिपब्लिकन एकता मंचने आंदोलन केले आहे. काळा पैसा देशाच्या तिजोरीत परत आणला पाहिजे कारण त्यामुळे विकासकामे होऊन महागाई कमी करता येईल, असे त्या म्हणाल्या.
नागपुरातून लढणार
सुलेखा कुंभारे नागपुरातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जाते, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता लोकसभा निवडणूक लढणार असल्याची स्पष्ट कबुली कुंभारे यांनी दिली. मात्र, नागपूरच काय विदर्भातील कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढू शकते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bahujan republican ekta manch to contest lok sabha election with separate vidarbha agenda