‘राईड ऑन बॅटरी ऑपरेटेड स्क्रब ड्रायर मशीन’ हे अद्ययावत उपकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले आहे. एक कर्मचारी बॅटरीकार सदृश्य उपकरणाने तासाभरात ५ हजार २०० मीटर एवढा परिसर कमी पाण्यात आणि कमी श्रमात स्वच्छ करू शकणार आहे. मेडिकल कर्मचाऱ्यांच्या तुटवडय़ावर हे उपकरण काही प्रमाणात वरदान ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
मेडिकलचा २०० एकर परिसर असून येथे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त पदे असल्याने येथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. अस्वच्छतेमुळे येथील रुग्णांनाच संसर्गाचा धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. जिल्हा नियोजन विकास समितीने मेडिकलला ११ लाखापेक्षा जास्त किमतीचे बॅटरीवर चालणारे ‘राईड ऑन बॅटरी ऑपरेटेड स्क्रब ड्रायर मशीन’ स्वच्छतेवर उपाय करण्यासाठी मंजूर केली. ही मशीन मंगळवारी मेडिकलच्या ताफ्यात सामील झाली आहे. हे उपकरण एकच कर्मचारी हाताळत असून ६.५ प्रती तास किमी वेगाने चालते.
स्वच्छता करणारी बॅटरीवरील उपकरण कारप्रमाणे चालवून एकदा चार्ज झाल्यावर सलग ४ तास सेवा देते. यात १०२ लिटर पाण्याची स्वतंत्र टाकी असून कमी पाण्यात कोणतेही प्रदूषण न करता हे उपकरण स्वच्छता करते. या उपकरणात २ ब्रश ४० सेंमीचे आहेत. स्वच्छता करताना १७३० मिलीलिटर व्हॅक्युम प्रेशर निर्माण करून स्वच्छता करते. या उपकरणाची लांबी व रुंदी ८५ सेंमी बाय १७५ सेमी तर उंची १७५ सेमी असून मेडिकलच्या वॉर्डाच्या बाहेरचा परिसर लवकर स्वच्छ करू शकणार आहे.
कंपनीच्यावतीने मेडिकलच्या तीन ते चार कर्मचाऱ्यांना उपकरण चालविण्याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पंधरापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे काम एकाच मशिनच्या माध्यमातून उपकरणामुळे शक्य होणार आहे. यामुळे निश्चितच गरिबांना चांगल्या स्वच्छ वातावरणात उपचार मिळेल. यातून धूर निघत नसल्यामुळे ते उपकरण पर्यावरणपूरक असल्याचे बोलले जाते. हे पहिलेच उपकरण विदर्भाच्या शासकीय रुग्णायातील आहे हे विशेष.
तीन उपकरणे मिळाली
जेट प्रेशर क्लिनर, फ्लीपर, मॅन्युअल स्क्रबर ड्रायर अशी आणखी तीन उपकरणे जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून मिळाली आहेत. त्यामुळे मेडिकलच्या प्रत्येक वॉर्डात स्वच्छता होऊन रुग्णांना स्वच्छतेच्या वातावरणात चांगले उपचार मिळतील. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. बलचंद कोवे, परशुराम दोरवे यांनी उपकरण मिळविण्याकरिता प्रयत्न केले.