तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे पाणी दूषित असल्याचे गटविकास अधिकारी परिक्षीत यादव यांनी स्पष्ट केले असून ग्रामसेवकांवर कारवाईचा आसूड उगारला आहे. असे असले तरी सभापती सुनिता बनकर व उपसभापती कैलास कणसे यांनी मात्र दूषित पाणीपुरवठय़ात लक्षणीय सुधारणा झाली असल्याचा दावा केला आहे.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांत पंचायत समितीत समन्वय नसल्याचेच या प्रकाराने स्पष्ट झाले. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी तालुक्यात दूषित पाण्यामुळे डेंगीचे रूग्ण वाढले आहेत. निमगाव खैरी येथे एका महिलेचा मृत्यू झाला. अधिकारी हे लोकांच्या जिवाशी खेळत आहेत. पाणी नमुने दूषित येऊनही ग्रामसेवक व आरोग्य सेवकावर कारवाई केली जात नाही, अशी तक्रार केली होती. त्यांनी जुलैमध्ये गटविकास अधिकारी यादव यांनी ग्रामसेवकांना पाठविलेल्या नोटिसांचा संदर्भ दिला होता. तालुक्यातील १६० पाणी नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींचे नमुने अयोग्य आढळून आले. दुषित पाण्यामुळे जलजन्य रोगाचे आजार होतात. असे आजार झाल्यास ग्रामसेवकांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला होता. सभापती बनकर, उपसभापती कणसे यांनी पटारे यांनी केलेल्या आरोपाचा खुलासा केला असून ग्रामपंचायतींनी जलसुरक्षकांची नेमणूक केली आहे. दरमहा पाणी नमुने तपासले जातात. दोन गावांतील टीसीएलमध्ले क्लेरीनचे प्रमाण कमी आढळून आल्याने ते बदलण्यात आले. मागील महिन्यात १२५ पाणी नमुन्यांपैकी अवघे चौदा नमुने अयोग्य आढळून आले. तालुक्यात साथस्वरूप आजार परसलेले नाहीत असा खुलासा त्यांनी केला. ग्रामसेवकांवर कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.