पनवेलच्या रस्त्यांशेजारील पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनले आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता रोशन म्हात्रे हा चार वर्षीय मुलगा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मार्गावरून आईसोबत चालत असताना उघडय़ा गटारात पडला. फडके मार्गावरील राजे कॉम्प्लेक्स, युनियन बँक, अनिल कम्युनिकेशन आणि नेहा मेडिकलसमोरील पदपथावरील गटारांवर झाकणे नसल्याने येथे सर्रास हे प्रकार घडतात. पनवेलचे पदपथ फेरीवाले आणि हातगाडीचालकांसाठी आंदण देण्यात आले आहते. पनवेल नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग फेरीवाले हटाव मोहीम दिखाव्यासाठी हाती घेतात. काही नेत्यांना तात्पुरते खूश करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याची तक्रार रहिवाशांकडून सातत्याने होते. नगर परिषदेने शिवाजी चौक ते आंबेडकर पुतळा या मार्गावर असणारे फेरीवाले तसेच शिवाजी चौकाशेजारील नवीन व्यापारी संकुलाच्या इमारतीसमोर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ जाहीर केले आहे. मात्र तेथेच फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते दिसतात. राजकीय आशीर्वादामुळे आणि काही अधिकाऱ्यांच्या चिरीमिरी व्यवहारामुळे या फेरीवाल्यांची रांग मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत असल्याचे कळते. नगर परिषदमधील अभियंता विभाग रोशन म्हात्रेसारखी किती चिमुरडे गटारात पडल्यानंतर जागे होणार, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे.