महापालिका निवडणुकीच्या वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत मारामाऱ्या, भांडणे सुरू झाल्याने वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेतून फुटलेले नगरसेवक जसपालसिंग नरजनसिंग पंजाबी (रा. वंजार गल्ली) यांना मंगळवारी दुपारी शिवसेनेच्याच इच्छुक उमेदवाराकडून मारहाण करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगरमध्ये शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांतील इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांत धुमश्चक्री उडाली होती. त्याचे कारणही महापालिकेची आगामी निवडणूक हेच होते. आता मंगळवारी दुपारी पंजाबी यांना झालेल्या मारहाणीचे कारणही मनपा निवडणूक हेच आहे.
पंजाबी यांनी एमआयडीसी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, तू माझ्याविरुद्ध महापालिका निवडणुकीत उभा का राहतो, याचा राग धरून सचिन तुकाराम जाधव, सागर काळे व विशाल काळे (तिघेही रा. किंग्ज गेट) या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नवनागापूरमधील साईनगर फाटा येथे घडली. अधिक तपास उपनिरीक्षक गौड करत आहेत.
पंजाबी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत, परंतु आता ते सेनेपासून लांब तर मनसेच्या जवळ गेले आहेत. सचिन जाधव याच प्रभागातून सेनेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात.