आमदार राजेश क्षीरसागर यांना धक्काबुक्की करणाऱ्यांना बेदम चोप दिल्याप्रकरणी आमदारांचे बंधू, चिरंजीव, स्विय सहायक व एक शिवसैनिक अशा चौघांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आमदार क्षीरसागर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बंधू संजय विनायक क्षीरसागर, मुलगा ऋतूराज क्षीरसागर, स्वीय सहायक राहुल बंदोडे व शिवसैनिक सुनील शामराव जाधव यांचा समावेश आहे.    
आमदार क्षीरसागर यांचे बंधू संजय क्षीरसागर यांचा विजय खाडे याच्याशी बुधवारी रात्री दोघा युवकांशी वाद झाला होता. ही माहिती समजल्यावर आमदार क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांत वाद झालेल्या ठिकाणी गेले होते. पण खाडे तेथून निघून गेला होता. काही वेळानंतर खाडे हा चार-पाच मित्रांसह आमदार क्षीरसागर यांच्या घराकडे गेला. त्यांनी क्षीरसागर यांना बोलावून धक्काबुक्की केली.
आमदार क्षीरसागर यांना धक्काबुक्की होत असल्याचे पाहून त्यांचे स्विय सहायक राहुल बंदोडे व कार्यकर्त्यांनी खाडे व त्याच्याबरोबर आलेल्या लोकांना बेदम मारहाण केली. या सर्वाना इस्पितळात दाखल करण्यात आले.
दरम्यान या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संजय क्षीरसागर, ऋतूराज क्षीरसागर, राहुल बंदोडे, सुनील जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली.
 
चौकट
अंतर्गत मामला युतीचे पत्रक
दरम्यान याप्रकरणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष महेश जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत बुधवारी रात्री झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाला आहे, त्याला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन केले आहे. विजय खाडे याने चुकीच्या पध्दतीने आमदारांच्या घरी जाऊन क्रिया केल्याने आमदारांच्या कार्यकर्त्यांनी उध्दटपणाला उत्तर म्हणून प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार चुकीचा आहे. त्यामागे राजकीय इर्षां नाही. त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये, याबाबत तोडगा काढून प्रकरण संपविण्यात येईल. या प्रकरणाचा शिवसेना-भाजपा युतीवर कसलाही परिणाम होणार नाही. या वादावर दोन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी व अध्यक्ष पडदा टाकून हे प्रकरण संपल्याचे जाहीर करत आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
 ————-