वीज अभियंत्यास मारहाण; ५०जणांविरोधात गुन्हा

जिल्हय़ातील तीर्थपुरी (तालुका घनसावंगी) येथे महावितरणचे कनिष्ठ अभियंता एन. एम. जयस्वाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी बुधवारी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

जिल्हय़ातील तीर्थपुरी (तालुका घनसावंगी) येथे महावितरणचे कनिष्ठ अभियंता एन. एम. जयस्वाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी बुधवारी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. शासकीय कामात अडथळा व प्राणघातक हल्ल्याच्या आरोपावरून घनसावंगी पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तात्यासाहेब चिमणे यांच्यासह ५०जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  
दरम्यान, मारहाणीचा वीज अभियंते व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी निषेध नोंदविला. अखिल भारतीय विद्युत अभियंता महासंघाचे कार्यकारिणी सदस्य बालमुकुं द सोमवंशी यांनी सांगितले, की जयस्वाल यांना मारहाणीमुळे जिल्हय़ात महावितरणचे अधिकारी-कर्मचारी भयभीत झाले आहेत. काम करताना संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हय़ातील अभियंते-कर्मचारी मस्तगड येथील कार्यालयात एकत्र आले होते. जयस्वाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चिमणे व इतरांवर खोटे गुन्हे दाखल केले असून ते परत घ्यावेत, या मागणीसाठी तीर्थपुरीच्या ग्रामस्थांनी गुरुवारी जालना-बीड रस्त्यावर तीर्थपुरी फाटय़ावर रास्ता रोको आंदोलन केले. चिमणे यांनी सांगितले, की महावितरणच्या तीर्थपुरी कार्यालयाकडून अनेकदा ग्रामस्थांना अकारण वेठीस धरण्यात येते. एका ग्राहकाचे बंद मीटरचे पैसे जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार भरले तरी काहीतरी निमित्त काढून वीज पूर्ववत करण्यास टाळाटाळ केली जात होती. यासंदर्भात चौकशी केली असता उद्धट उत्तरे मिळाली. महावितरणचे अभियंते जनतेला वेठीस धरतात. जयस्वाल यांना मारहाणीचे कारण दाखवून त्याच्या निषेधार्थ अंबड, परतूर, मंठा, घनसावंगी या तालुक्यांच्या ठिकाणी उपकेंद्रांची वीज काही तास खंडित केली असल्याचा आरोप चिमणे यांनी केला.
दरम्यान, जयस्वाल यांच्यावर प्राणघातक हल्ला व शासकीय कामात अडथळा आणल्यावरून गोंदी पोलिसांनी तात्यासाहेब चिमणे, ज्ञानेश्वर मोरे, रामेश्वर बोबडे, तुकाराम बोबडे, सुदाम मापारे, रमेश बोबडे, सचिन चिमणे, दिलीप मोरे, अण्णासाहेब बोबडे यांच्यासह अन्य ५०जणांविरु द्ध गुन्हा नोंदविला. हरिभाऊ साबळे यांनी जयस्वाल यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. नवीन वीजजोडणीसाठी दिलेल्या अर्जाची पोचपावती मागितली असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला.
रास्ता रोको राष्ट्रवादीचा?
महावितरण विरोधात तीर्थपुरी फाटय़ावर रास्ता रोकोत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार अहमद देशमुख हेही काही काळ उपस्थित होते. रास्ता रोकोचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती चिमणे म्हणाले, की डॉ. देशमुख भोकरदनला निघाले असता त्यांची गाडी अडकून पडली होती. समोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसल्यामुळे ते रास्ता रोकोच्या ठिकाणी आले. घनसावंगी व अंबड दोन्ही तालुक्यांचे युवक राष्ट्रवादी अध्यक्षही या वेळी उपस्थित होते. डॉ. देशमुख भ्रमणध्वनीवर  उपलब्ध झाले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beating to electrical engineer crime against 50 person

ताज्या बातम्या