माळीवाडा भागातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता पालवे यांना शाळेच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्याच्या घटनेचा जिल्हा माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने निषेध केला असून पोलिसांनी सखोल चौकशी करून घटनेमागील सूत्रधार शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
समितीने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. शिक्षकांना शाळेत जाऊन मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत, गुन्हेगारांवर योग्य कारवाई होत नसल्याने या घटना वारंवार होत आहेत, त्यातून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. पुढील काळात अशा घटना घडू नयेत व शिक्षण क्षेत्राची बदनामी होऊ नये यासाठी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा सर्व संघटना आंदोलन करतील, असे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब बोडखे, शिक्षक संघाचे जिल्हा सचिव अप्पासाहेब शिंदे, एम. एस. लगड, भाऊसाहेब थोटे, उद्धव गुंड, चंद्रकांत चौगुले, भाऊ बारस्कर, सखाराम गारुडकर, विठ्ठल ढगे, राजेंद्र लांडे, चांगदेव कडू, शिरीष टेकाडे आदींनी हे निवेदन दिले.