स्वस्तात सोने मिळणार या आशेने गेलेल्या भिंगार येथील व्यापाऱ्याला कर्जत येथे सोन्याऐवजी मार खाण्याची वेळ आली. सुदैवाने तेथे पोलीस आल्याने व्यापाऱ्याचे दोन लाख रुपये वाचले. दरम्यान, पोलिसांनी त्या टोळीतील पाचजणांना अटक केली.
स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून भिंगार (नगर) येथील व्यापारी किरण प्रभाकर पाणपाटील (वय ४२) यांना कल्याण ज्ञानेश्वर भोसले (रा. पाटोदा, ता. आष्टी) याने दि. १६ला दोन लाख रूपये घेऊन बोलावले. ठरल्याप्रमाणे दि. १६ला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पाणपाटील आले. त्यांना कल्याणने दुचाकीवर बसवून घोगरगावमार्गे कर्जत तालुक्यातील रमजान चिंचोली येथे आणले. परंतु आधीच तेथे रस्त्याच्या कडेला भुजबळ यांच्या बागेत कल्याणचे साथीदार दबा धरून बसले होते. पाणपाटील जवळ येताच ज्ञानेश्वर गणा भोसले (वय ५०, पारोटी, तालुका आष्टी), सुमीत हलू भोसले (४५, हातवळण, ता. नगर), श्रीराम ज्ञानेश्वर भोसले (२२, पारोडी, ता. आष्टी), गोरख चव्हाण यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोर पैशाची मागणी करू लागले. पाणपाटील यांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या लोकांनी तिकडे धाव घेतली. सुदैवाचे तेथून पोलिसांचे गस्ती घालणारे पथक जात होते. लोकांनी त्वरित पोलिसांना याबाबत कळविले. त्यामुळे पोलीस येत असल्याचे पाहून हल्लेखोर पळू लागले. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून पाचजणांना अटक केली.