विदर्भाला कायम सावत्र वागणूक देणाऱ्या काँग्रेसने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आव्हान देण्यापूर्वी विदर्भाशी संबंधित केवळ पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे खुले आव्हान येथील लोकनायक बापूजी अणे स्मारक संयोजक अ‍ॅड. अविनाश काळे यांनी दिले आहे.
समितीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून विदर्भाशी संबंधित पाच प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी द्यावीत आणि नंतरच विकासाच्या गप्पा कराव्या, असे अ‍ॅड. काळे यांनी या पत्रात म्हटले. यात पुढील पाच प्रश्नांचा समावेश आहे. १) विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत व विदर्भाचा विकास व्हावा यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेला मुख्यमंत्र्यांनी विरोध का केला?, २) चिंचन प्रकल्पाद्वारे ५ लाख ८६ हजार २९८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. गेल्या १० वर्षांमध्ये फक्त २.३८ टक्के जमीन ओलिताखाली आली असून या गतीने प्रकल्प पूर्ण होण्यास ३०० वर्षे लागतील याला विकास म्हणायचा काय?, ३) विदर्भातील एकूण १४४ सिंचन प्रकल्पाद्वारे ११लाख १४ हजार ७२३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याची शक्यता असून ती कधी येणार?,  ४) सिंचन प्रकल्प रखडल्याने सुमारे ४५ लाख रोजगारनिर्मिती  ठप्प आहे. १५ कोटी रुपयांच्या कृषी उत्पादनांचे दरवर्षी नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे किमान १ लाख कोटी रुपयांचे नुकसान आहे. याला विकास म्हणायचा का?, ५) महाराष्ट्र राज्य विरुद्ध शारंगधर चव्हाण प्रकरणात सत्तेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायलयाने महाराष्ट्र शासनाला १० लाख रुपये दंड ठोठावला होता, याचा आपल्याला विसर पडला की काय, अशी विचारणा करत मुख्यमंत्री आताही आपण नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार का? अशीही विचारणा अ‍ॅड. अविनाश काळे यांनी केली आहे.