रिक्षा-टॅक्सी यांचा वाढता व्यवसायामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे सांगितले जाते. ही गोष्ट रिक्षा-टॅक्सी संपाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली असून १७ जून रोजी झालेल्या रिक्षा-टॅक्सी संपाच्या दिवशी बेस्टला प्रचंड फायदा झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या दिवशी इतर दिवसांच्या तुलनेत बेस्टची प्रवासीसंख्या २० लाखांनी जास्त होती. तसेच या एका दिवसाचे उत्पन्न इतर दिवसांपेक्षा दोन कोटींनी जास्त होते. विशेष म्हणजे या दिवशी बेस्टच्या गाडय़ा वेळेत पोहोचल्याचेही प्रशासनाने सांगितले.

स्थानक परिसरात रिक्षा-टॅक्सी यांच्या गर्दीमुळे बसगाडय़ांना वाट काढणे शक्य होत नाही. परिणामी अनेकदा प्रवासी बेस्टऐवजी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत बेस्टची दर दिवशीची प्रवासी संख्या ४५ लाखांवरून आधी ३५ लाख आणि आता ३० लाख एवढी खालावली आहे. त्यामुळे बेस्टच्या परिवहन विभागाचे उत्पन्नही प्रचंड कमी झाले आहे. मात्र, १७ जून रोजी झालेल्या संपादरम्यान पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रिक्षा-टॅक्सी यांची वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या संपादरम्यान प्रवाशांनी बेस्टने वाहतूक करणे पसंत केले. या दिवशी बेस्टने आपल्या अतिरिक्त बसगाडय़ा रस्त्यांवर उतरून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. या संपाच्या दिवशी बेस्टने तब्बल ५० लाख प्रवाशांची वाहतूक करत विक्रमी ५.७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.