‘बेस्ट’ची चलाखी, प्रवाशांना भूर्दंड..

शहरभर मोक्याच्या ठिकाणी जागा, हजारो बस थांब्यांवर जाहिरातीची संधी अशा एक ना अनेक मार्गातून नफा कमावण्याऐवजी फक्त प्रवाशांच्या खिशात

शहरभर मोक्याच्या ठिकाणी जागा, हजारो बस थांब्यांवर जाहिरातीची संधी अशा एक ना अनेक मार्गातून नफा कमावण्याऐवजी फक्त प्रवाशांच्या खिशात हात घालणाऱ्या ‘बेस्ट’ प्रशासनाची आणखी एक चलाखी भाडेवाढीनंतर लक्षात आली आहे. फक्त एक रुपया भाडेवाढ होणार असल्याचे ‘बेस्ट’कडून सांगण्यात येत असले, तरी सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असलेल्या लहान टप्प्यात थेट दोन ते चार रुपयांची वाढ करत ‘बेस्ट’ने आपल्या तिजोरीत आणखी वाढ करून घेतली आहे. प्रवासी मात्र या भरुदडामुळे वैतागले असून,  बसच्या दरवाढीमुळे महिन्याला रोज येता-जाता १००-१५० रुपयांचा फटका बसणार याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
Untitled-1
बेस्ट तब्बल ६० किलोमीटरच्या टप्प्यातील प्रवास करत असली, तरी सर्वाधिक म्हणजे ६० ते ७० टक्के प्रवासी केवळ सात किलोमीटरच्या टप्प्यात प्रवास करतात. आतापर्यंत बेस्टकडून दोन, तीन, पाच आणि सात किलोमीटरचे टप्पे आखण्यात आले होते. या सर्व टप्प्यांमध्ये फेब्रुवारीपासून एक रुपयाने आणि एप्रिलपासून आणखी एक रुपयाची वाढ होत असल्याचे बेस्टकडून जाहीर करण्यात आले होते.
प्रत्यक्षात बेस्टने प्रवासाचे जुने टप्पेच मोडीत काढल्याने प्रवाशांना १० रुपयांवरून १३ रुपये व १२ रुपयांवरून १६ रुपये मोजावे लागत आहेत. एवढेच नव्हे तर तीन किमीपर्यंतच्या प्रवासासाठी बेस्टने एक रुपया वाढीच्या नियमाला हेतुपुरस्सर बगल देत एप्रिलऐवजी १ फेब्रुवारीपासूनच दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएसटी किंवा चर्चगेट रेल्वेस्टेशनपासून आठ रुपयांत होणारा प्रवास आता दहा रुपये झाला आहे. चारकोपमध्येही बोरिवली स्थानकापर्यंत १२ रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी १६ रुपये, तर कांदिवलीसाठी १० रुपयांऐवजी १३ रुपये मोजावे लागत आहेत.
दररोज ४० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. यातील सुमारे २५ लाखांहून अधिक प्रवासी सात किलोमीटपर्यंतच प्रवास करणारे आहेत. तिकीट दर दोन ते चार रुपयांनी वाढल्याने प्रत्यक्षात बेस्टच्या तिजोरीत दररोज ७५ लाख रुपयांची अधिक रक्कम जमा होणार आहे. केवळ प्रवाशांच्या खिशात हात घालण्यापेक्षा बेस्टने नफ्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करायला हवा, असे मत बेस्ट समितीतील सदस्य सातत्याने मांडत असतानाही कोणतीही योजना न राबवता केवळ पालिकेची मदत, वीज ग्राहकांवर भार आणि प्रवाशांना भरुदड याच पारंपरिक अस्त्राचा वापर ‘बेस्ट’कडून होत आहे.
बस नेहमी उशिरा येतात. वाहतूक कोंडीमुळे बसला खूप वेळ लागतो. अनेकदा घोषणा करूनही वेबसाइट किंवा मोबाइलवरून बसच्या वेळांची सूचना देण्याची योजना सुरू करण्यात आलेली नाही. मात्र प्रवाशांच्या खिशात हात घालायला बेस्ट नेहमीच तयार असते, असे मत नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केले.
बेस्टची चलाखी
* तीन, पाच व सात किलोमीटरचा टप्पा मोडीत. त्यामुळे प्रवाशांना चार, सहा व आठ किमीचे पसे मोजावे लागणार.
* याचाच अर्थ तिकीटभाडे ८ रुपयेवरून १० रु., १० रुपयांवरून १३ रु., तर १२ रुपयांवरून थेट १६ रुपये झाले आहे.
* ही वाढ २५ टक्के आहे.
* एप्रिलमध्ये पाच किमीपर्यंतच्या प्रवासासाठी १४, तर सात किमीच्या प्रवासासाठी १७ रुपये मोजावे लागणार.
३१ जाने.पर्यंतचे भाडे
२ किमी – ६ रुपये
३ किमी – ८ रुपये
५ किमी – १० रुपये७ किमी – १२ रुपये

१ फेब्रु.पासूनचे भाडे
२ किमी – ७ रुपये
४ किमी – १० रुपये
६ किमी – १३ रुपये
१० किमी – १६ रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Best raise the ticket price more than one rupee