पतीच्या अकाली मृत्यूने खचून न जाता आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांचे स्वबळावर संसार उभे करण्यास मदत करणाऱ्या येथील दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेने केलेले कार्य म्हणजे मानवतेचा झरा अजूनही वाहत असल्याची प्रचिती आणणारा आहे. या संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे नराश्य घालवून त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली, या शब्दात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दीनदयाल संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
त्यांच्यासाठी दीनदयाल शेतकरी विकास परिषदेव्दारा अणे महिला महाविद्यालयात झालेल्या भाऊबिजेच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरच्या डॉ. रंजना व्याघ्रळकर होत्या. डॉ. रंजना व्याघ्रळकर यांनी पती निधनानंतर स्वबळावर आईवडीलांच्या मदत आणि आशीर्वादाने जे धीरोदात्त कार्य केले यापासून शेतकरी विधवा महिलांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
डॉ. रंजना व्याघ्रळकर म्हणाल्या, त्यांचे पती दिवंगत झाल्यावर त्यांचा दवाखाना बंद पडेल, अशी चर्चा असतांना पतीचे कार्य पुढे चालवण्यासाठी सर्वस्व झोकून आपण पतीचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आणि ग्रामीण भागात आयुर्वेद पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. दीनदयाल शेतकरी विकास परिषद सदैव तुमच्या पाठीशी राहील, याची खात्री त्यांनी संस्थेच्या वतीने दिली. जिल्ह्य़ात असलेल्या २०० वर शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांसाठी दीनदयालने अनेक प्रकल्प राबवून राज्यात जो उपक्रम सुरू केला, त्याचे यावेळी अनेक मान्यवरांनी प्रेरणादायी या शब्दात गौरव केला. दीडशेवर विधवांना यावेळी भाऊबिजेची भेट व साडीचोळी देण्यात आली. आमदार मदन येरावार, कवी शंकर बढे, दाणी गुरुजी, अजय मुंधडा, सी.बी. मोर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुर्यकांत गाडे पाटील यांच्या हस्ते भाऊबिजेची भेट देण्यात आली.
दीनदयालसारख्या सेवाभावी संस्थेने जिल्ह्य़ातील शेतकरी व गरिबांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरू केलेले काम वाखाणण्यासारखे असून अशा संस्था व प्रशासनाने सामूहिक प्रयत्न केल्यास जिल्ह्य़ावर लागलेला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा, असा कलंक खोडून काढण्यात काहीच वेळ लागणार नाही. जिल्हाधिकारी म्हणून या कामासाठी मी सदैव तयार असल्याचे राहुन रंजन महिवाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन विवेक कवठेकर, प्रास्ताविक विजय कद्रे,मीरा फडणवीस यांनी, तर आभार मीरा घाटे यांनी मानले. मान्यवरांच्या भाषणानंतर शेतकरी विधवांतर्फे आमंत्रित जिल्हाधिकारी महिवाल, आमदार मदन येरावार कवी शंकर बडे, सुर्यकांत गाडे पाटील इत्यादींना ओवाळण्यात आले. त्यांच्यातर्फे विधवा भगिनींना भाऊबिजेची भेट देण्यात आली. यावेळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.