सातारच्या संबोधी प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी या वर्षी फुले, आंबेडकर-डाव्या चळवळीचे मूलभूत संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ विचारंतव डॉ. गेल ऑम्वेट यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.  
रुपये पाच हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सहा डिसेंबरला डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सायंकाळी साडेसहा वाजता साताऱ्यातील भारत स्काउट गाइड संस्थेच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
डॉ. गेल ऑम्वेट डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेत्तर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे. मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी सन १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे. भारतातील दलित, शेतकरी, ग्रामीण स्त्रिया, पर्यावरण तसेच जातीअंताच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.