राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि गुन्हेगारी मंडळी यांच्यातील कथित संबंधांचा छडा लावण्यासाठी कार्यप्रवण झालेल्या पोलीस यंत्रणेने शिवसेना नेत्यांची चौकशी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंद सोनवणे यांची सोमवारी चौकशी केली. गरज भासल्यास सोनवणे यांना चौकशीसाठी पुन्हा बोलाविले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. परदेश वारीहून परतल्यानंतर एकदा चौकशी झालेले शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनाही सायंकाळी पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पोलीस यंत्रणेला जबाबदार ठरविणारे राजकीय पक्षांचे पदाधिकारी दुसरीकडे वेगवेगळ्या टोळक्यांच्या संपर्कात असल्याची बाब निदर्शनास आल्याच्या पाश्र्वभूमीवर, तपास यंत्रणेने या संबंधांची उकल करण्याच्या दिशेने चौकशी हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी भीम पगारे या गुंडाची चांगले टोळीने हत्या केली होती. त्या प्रकरणी सात जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात गणेश चांगले हा सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा व्यायामशाळेत वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. शिवसेनेच्या कार्यक्रमात चांगलेचा सहभाग राहिला.
या आधारावर उभयतांच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी महानगरप्रमुख बोरस्तेंना हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परंतु, ते परदेशात असल्याने उपस्थित राहिले नाही. परदेशातून आल्यावर रविवारी त्यांची दीड तास चौकशी करण्यात आली. सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
भीम पगारेची हत्या होण्याआधी पगारेच्या टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून ७० हजाराची खंडणी उकळली होती. अपहरण व खंडणी प्रकरणी मयत पगारेसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही संशयित अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी शिवसेनेचे पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक दत्तात्रय सूर्यवंशी व मनसेचे नगरसेवक बापू सोनवणे यांची चौकशी केली आहे. याच कारणावरून पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आनंद सोनवणे यांना पोलीस यंत्रणेने नोटीस बजावली. त्यानुसार
सोमवारी सकाळी अकरा वाजता ते पोलीस उपायुक्त कार्यालयात हजर झाले. पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी सुमारे दीड ते दोन तास चौकशी केली. गरज भासल्यास त्यांना पुन्हा बोलाविले जाईल, असे बारगळ यांनी सांगितले.