नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करण्याची संधी ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. ३१ डिसेंबपर्यंत ही नोंदणी करता येणार असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन ठाणे महापालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी तथा जन्म-मृत्यू विभाग निबंधक डॉ. आर. टी. केंद्रे यांनी केले आहे. आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी १ जानेवारी २००० पूर्वी झालेली आहे, परंतु नावाची अद्याप नोंद झालेली नाही अशा सर्व नागरिकांनी आपल्या जन्माच्या नोंदणीमध्ये नावाची नोंद ३१ डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत करण्याबाबत सुचना देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, एस.एस.सी. प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करून नावाची नोंद करावी.
