महिनाभराच्या ताणाताणीनंतर अखेर चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील जागावाटपावर अपेक्षेप्रमाणे सोमवारी एकमत झाले. निम्म्या जागांवर आग्रही असलेल्या भाजपने अखेर हा दावा प्रतीकात्मक ठेवला असून, दोन पावले मागे सरकत ३१ जागांवर समाधान मानले आहे. ३६ जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्या असून, एका जागेचा निर्णय श्रेष्ठींवर सोपवण्यात आला आहे.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आणि शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी संयुक्तरीत्या ही माहिती दिली. प्रभागनिहाय जागावाटप उद्या (मंगळवार) निश्चित करण्यात येणार आहे. शनिवारी युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी दुसऱ्या फेरीत जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार भाजप ३१ आणि शिवसेना ३६ अशा वाटपावर एकमत झाल्याने त्यानुसार निर्णय घेण्यात आला. एका जागेचा निर्णय श्रेष्ठींवर सोपवण्यात आला असून, ते निर्णय देतील त्या पक्षाला ही जागा मिळेल. आज झालेल्या बैठकीस भाजपच्या वतीने आगरकर यांच्यासह सुनील रामदासी व शहर जिल्हा सरचिटणीस अनंत जोशी तर शिवसेनेच्या वतीने कदम यांच्यासह माजी नगरसेवक अनिल शिंदे, सुधीर पगारिया हे उपस्थित होते. भाजप कार्यालयात ही बैठक झाली.आगरकर यांनी सांगितले, की भाजपने सुरुवातीपासून ३४ जागांचा आग्रह धरला होता. मात्र प्रत्यक्ष चर्चेत ३२ जागा मागून आज ३१ जागांना मान्यता दिली. प्रलंबित एक जागा भाजपच्या वाटय़ाला आल्यास त्या ३२ होतील. नगर शहरात दोन्ही पक्षांची गेल्या वीस वर्षांपासून युती आहे. ती यापुढच्या काळातही ती कायम राहावी अशीच भावना दोन्ही पक्षांत आहे. त्याचा आदर ठेवूनच युती तुटू नये यासाठी ताठर भूमिका न घेता उभयमान्य तोडगा काढण्यात आला. भारिपसह महायुती असल्याने त्यांनाही यात सहभागी करून घेतले जाणार असून त्याचाही निर्णय लगेचच होईल, त्यात कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास आगरकर यांनी व्यक्त केला.दरम्यान, जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर आता प्रभागनिहाय निश्चितीसाठी उद्या (मंगळवार) भाजप-शिवसेना युतीची बैठक होणार आहे. युतीत काही जागांवर दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी दावा केले असून, काही प्रभागांत दोन्ही जागा शिवसेनेला तर काही प्रभागांत दोन्ही जागा भाजपला हव्या आहेत. अशाच काही जागा या प्रभाग निश्चितीत कळीच्या ठरण्याची शक्यता व्यक्त होते, मात्र युती करण्याचा धोरणात्मक निर्णय आज झाल्याने त्यात आता फारशा अडचणी राहणार नाहीत असे दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले.