सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जादूटोणाविरोधी कायदा प्रभावीपणे जनमानसांत पोहोचविण्याबाबत ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांनी दिली.
उस्मानाबाद येथे आयोजित सत्कार समारंभानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली. समितीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष किरण सगर, उस्मानाबाद शाखाध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, बुवाबाजी विरोधी संघर्ष समितीचे सचिव सुजित ओव्हाळ यांनी प्रा. शिंदे यांना जादूटोणाविरोधी कायदा सरकारी यंत्रणेकडून प्रभावीपणे जनमानसांत पोहोचविण्यास आवश्यक ते प्रचार साहित्य व प्रशिक्षणाची व्यवस्था उभारली जावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्याची विनंती केली. त्यावर प्रा. शिंदे यांनी संमती दर्शविली. मुख्यमंत्र्यांना त्यांची सही असलेले निवेदन दिले. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात व त्यामागील सूत्रधारांना समोर आणण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र भावनाही व्यक्त केल्या. निवेदनावर मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, कार्यवाहक कुंडलिक अतकरे यांनीही सही करून संमेलनात ठराव मांडणार असल्याचे स्पष्ट केले.