scorecardresearch

महापालिकेचे मलेरिया, डेंग्यूविरोधात विशेष अभियान

राज्यात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने मलेरिया, डेंग्यू नियंत्रण विशेष अभियान हाती घेतले आहे.

राज्यात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने मलेरिया, डेंग्यू नियंत्रण विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत घर, सोसायटी, आजूबाजूचा परिसर येथील डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम घेण्यात येणार आहे. ५ ते २३ नोव्हेंबपर्यंत विशेष अभियान राबवण्यात येणार आहे.
आपली नवी मुंबई निरोगी नवी मुंबई हा संकल्प नजरेसमोर ठेवून महानगरपालिका आयुक्त ए.एल.जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग डेंग्यू नियंत्रणासाठी उपयायोजना राबिवण्यात येणार असून आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील विविध नोडमध्ये भेट देऊन अभियानाअंतर्गत चालणाऱ्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात नेरुळ येथील रासायनिक धुरीकरण व डास अळीनाशक फवारणी कामाची पाहणी केली असून धुरीकरण कताना कानाकोपऱ्यात लपलेल्या डासांपर्यंत धूर पोहोचला पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच करावे नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी डास अळीनाशक गप्पी माशांच्या पैदास केंद्राचीही पाहणी करून गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे नागरिकांनी नजीकच्या आरोग्य केंद्रातून विनामूल्य गप्पी मासे घेऊन साचलेल्या पाण्यात टाकावेत, असे आवाहनही जऱ्हाड यांनी केले. करावे नागरी आरोग्य केद्रांतील प्रयोगशाळा, नागरी केंद्राला भेट दिली. तसेच सानपाडा सेक्टर ३० येथील नाल्यांची पाहणी, वाशी सेक्टर येथील चौकातील कारंजे व तेथील बंद गटरांमध्ये पाण्यात सोडलेल्या गप्पी माशांची पाहणी केली. कोपरखरणे येथील मत्स्यशेती केल्या जाणाऱ्या खाडीकिनाऱ्यावरील भागास भेट दिली असता त्या ठिकाणी डास अळ्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर मत्स्यशेतीची ठिकाणे असून त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक अळीनाशके फवारण्याचे निर्देश दिले.
अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने रुग्ण संशोधन कार्यवाही तसेच डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्व ठिकाणी भेटी देणार आहेत. तरी नवी मुंबईकरांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी केले.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त ( Mahamumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-11-2014 at 06:50 IST