परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे चालविण्यात येणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्ह्य़ाचा हेतू आणि तो सिद्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने खुनाच्या प्रकरणात चार जणांना  सुनावलेली  जन्मठेप रद्द करत त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठाने तानाजी राऊत, दत्ता गायकवाड, सनी शिंदे आणि गोरख जाधव या चार आरोपींची एका सराफाच्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली. चेंबूर येथील ‘वंदना ज्वेलर्स’चा मालक बाबुलाल जैन यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी २००४ रोजी विक्रोळी परिसरात एका चोरलेल्या टाटा सुमो गाडीत गस्तीदरम्यान पोलिसांना सापडला होता. जैन यांच्या छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी पोलिसांना तानाजीचा रक्ताने माखलेला शर्ट सापडला होता. त्याचाच धागा पकडत पोलिसांनी आधी त्याला नंतर एक-एक करून उर्वरित आरोपींना अटक केली.  न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे बारकाईने तपासले. मात्र या पुराव्यांवरून आरोपींनीच खून केल्याचे सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा देत तसेच खुनामागील नेमका हेतू सिद्ध करण्यातही सरकारी पक्षाला अपयश आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपींचे बाबुलाल जैन यांच्याशी पूर्ववैमनस्य होते वा पैशांच्या वादातून त्यांनी हा गुन्हा केला हे सिद्ध करण्यात सरकारी अपयशी ठरला आहे. हा संपूर्ण खटला हा परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित असून अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये गुन्ह्य़ामागचा हेतू स्पष्ट होणे हेही अत्यंत महत्त्वाचे असते. केवळ घटनास्थळी आरोपीचा शर्ट आढळून येणे पुरेसे नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध करणारा दुसरा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही. परिणामी खुनामध्ये आरोपींचा सहभाग स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने तानाजीसह चौघांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप रद्द केली व त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.