सकाळच्या प्रसन्न वातावरणात झालेल्या ‘ब्रम्हनाद’ मैफिलीत कोलकात्याच्या पं. बुधादित्य मुखर्जी यांच्या सतारवादनाने शास्त्रीय संगीताच्या दर्दीना मंत्रमुग्ध केले. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवारी  सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे, दिलीप म्हैसाळकर, हितेंद्र कुळकर्णी व डॉ. अग्निहोत्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विभागीय आयुक्त अनुपकुमार, केंद्राचे संचालक पीयूषकुमार तसेच इतर मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पं. बुधादित्य मुखर्जी यांनी ललित रागाच्या वादनाने मैफिलीला प्रारंभ केला. तालाबरोबर आलाप, जोड व झाला सादर करून त्यांनी त्रितालाच्या मध्य लयीत बंदिश सादर केली. राग अलैहया बिलावल सादर करून त्यांनी राग भरवीने कार्यक्रमाची सांगता केली. शौमेन नंदी यांनी तबल्यावर साथसंगत केली. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. उपसंचालक स्मिता राव, कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी, इतर कर्मचारी व अनेक रसिक कार्यक्रमाला उपस्थित होते.